डोळ्यात मिरची पूड फेकून भाजपच्या पदाधिका-यावर प्राणघातक हल्ला

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन

व्यायाम करुन परत जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी भाजपच्या जिल्हा सरचिटणीस संजय फत्तेलष्कर यांच्यावर मिरची पूड फेकून तलवारीने वार केले. ही घटना रविवारी (दि.६) सायंकाळी औरंगाबाद येथील बेगमपुरा भागात घडली. फत्तेलष्कर यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

संजय फत्तेलष्कर हे आज सायंकाळी विद्यापीठमधून व्ययाम करुन घराकडे परत जात होते. त्यावेळी चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर मिरची पूड फेकून तलवारीने वार केले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच बेगमपुरा पोलीस घटनास्थळी आले असून हल्लेखोरांचा शोध सुरु केला आहे.

संजय फत्तेलष्कर यांच्यावर विद्यापीठ हॉस्टेल क्रमांक दोनजवळ अज्ञात व्यक्तींनी तलवारीने हल्ला केला. मिरची पूड फेकून कारमध्ये आलेल्या चार ते पाच जणांनी तलवारीने हल्ला केला. हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. बेगमपुरा पोलीस पुढील तपास करत आहेत.