डीएसके यांच्या लेखापाल, अभियंता यांच्या जामीनावर गुरुवारी सुनावणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन
बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांचे लेखापाल सुनिल घाटपांडे आणि अभियंता राजीव नेवासकर यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी (दि. ५) विशेष न्यायाधीश डी. जी. मुरुमकर यांच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान, डीएसके यांचा मुलगा शिरीष याची पोलीस कोठडीची मुदत आज (सोमवार) संपली. शिरीष यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना गुरुवार (दि.५) पर्य़ंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

घाटपांडे आणि नेवासकर यांच्या जामीन अर्जावर विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांच्या न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार होती. मात्र, काही कारणास्तव न्यायाधीश सरदेसाई न्यायालयात उपस्थित राहू शकले नाहीत. घाटपांडे आणि नेवासकर यांना विशेष न्यायाधीशांनी १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. घाटपांडे यांच्या वतीने अ‍ॅड. एस. के. जैन यांनी बाजू मांडली. नेवासकर यांच्या वतीने अ‍ॅड. रोहन नहार यांनी बाजू मांडली. घाटपांडे आणि नेवासकर यांच्या जामीन अर्जावर गुरूवारी (५ जुलै) सुनावणी घेण्यात येणार आहे. बचाव पक्षाच्या वकिलांनी गुरूवारी पुन्हा बाजू मांडावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

[amazon_link asins=’B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’95f8a087-7e07-11e8-9c7b-c7379d8ea66a’]

घाटपांडे यांना पोलिसांकडून करण्यात आलेली अटक बेकायदा आहे. त्यांना चौकशीसाठी पोलिसांनी बोलाविले होते. त्यावेळी तपासासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे पोलिसांना उपलब्ध करून दिली होती, असे अ‍ॅड. जैन यांनी युक्तिवादात न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. नेवासकर डी. एस. कुलकर्णी यांच्याकडे काम करत होते. त्यांनी ठेवीदारांना गुंतवणुकीचे आमिष दाखवले नव्हते. ठेवीदारांची फसवणूक प्रकरणी नेवासकर यांचा संबंध नसल्याचे अ‍ॅड. नहार यांनी युक्तिवादात सांगितले होते.
डी. एस. कुलकर्णी यांचा मुलगा शिरीष यांना सुनावण्यात आलेल्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी संपली. शिरीष यांना विशेष न्यायाधीश मुरूमकर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. शिरीष यांच्याकडे तपास करायचा आहे. डी. एस. कुलकर्णी यांच्याकडून कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. याचा अर्थ तपास पूर्ण झाला असा काढता कामा नये. शिरीष यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण युक्तीवादात केली.

[amazon_link asins=’B07D11MDBS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a2e99d4e-7e07-11e8-b0f1-476fc27b0dbc’]

शिरीष यांच्या वतीने अ‍ॅड. सुशीलकुमार पिसे यांनी बाजू मांडली. या प्रकरणात कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे. डी. एस. कुलकर्णी यांच्याकडे चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे शिरीष यांना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी अ‍ॅड. पिसे यांनी केली. न्यायालयाने शिरीष यांना ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.