ताडोबा ‘बफर झोन’मध्ये वाघाचा मृत्यू

नागपूर: पोलीसनामा ऑनलाईन – ‘अवनी’ या नरभक्षक वाघिणीच्या मृत्यूचा वाद आजून चालूच असताना नागपुरातील ताडोबा बफर झोनमधील भाम डोली येथे शनिवारी सायंकाळी आणखी एका वाघाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान शॉक लागल्यामुळे या वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, शनिवारी सायंकाळी सहा वाजता ताडोबा बफर झोनमधील भाम डोली येथील एका शेतात हा वाघ मृतावस्थेत आढळला. दोन ते अडीच वर्षाचा हा वाघ असून विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, ही माहिती मिळताच वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, या वाघाच्या मृत्यूमुळे वन विभाग वाघांची योग्य पध्दतीने निगराणी करीत नसल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. यापूर्वीही ताडोबा बफर झोनमध्ये वाहनांच्या धडकेने आणि शॉक लागल्याने वाघांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
ताडोबात मोबाईल बंदी 
ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक ए. आर. प्रवीण यांनी परिपत्रक काढून ताडोबातील मोबाइल बंदीचे आदेश जारी केले आहेत. ताडोबात बिबट्या किंवा वाघ दिसल्यास पर्यटनाला आलेले पर्यटक इतर वाहनचालकांना किंवा पर्यटकांना मोबाइलवरून त्याची माहिती देतात. त्यामुळे इतर वाहनचालक घटनास्थळी पोहोचण्यासाठी भरधाव गाडी चालवतात. परिणामी पर्यटक आणि वाहनचालकांच्या जीवाला त्यामुळे धोका पोहोचू शकतो. शिवाय एकाच ठिकाणी सर्व पर्यटक एकत्र आल्यावर वन्यप्राण्यांचा मार्ग रोखला जातो, त्यामुळे ताडोबात मोबाइल वापरण्यास मनाई करण्यात येत असल्याचं प्रवीण यांनी या परिपत्रकात नमूद केलं आहे.
पर्यटकांच्या जिप्सीचा वाघाने केला पाठलाग 
दिवाळीच्या सुट्टयांमध्ये ताडोबाच्या जंगलात व्याघ्र दर्शनासाठी व जंगल सफारीचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांच्या जिप्सी वाहनामागे काल दि.११/११/२०१८ ला सकाळी आगरझरी बफर झोनमध्ये वाहनाचा वाघाने पाठलाग केला. त्यामुळे पर्यटकांत काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अतिपर्यटनामुळे वन्यप्राण्यांना एकांतवास मिळणे कठिण झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ताडोबात वन्यप्राण्यांनी मानवावर हल्ले केल्यास नवल वाटायला नको.
दरम्यान, अशा ठिकाणांना भेट देणारे अतिउत्साही पर्यटकांना वन्य जीवांसोबत सेल्फी आणि व्हिडीओ घेण्याचा मोह आवरत नाही. पण त्यामुळेच वन्य जीवांचे हल्ले झाल्याच्या देखील अनेक घटना आहेत.