लॉकडाउनमुळे व्याघ्र पर्यटनास मोठा फटका ! तब्बल 60 % उलाढाल थांबली

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे बहुतांश उद्योग आणि व्यापार आर्थिंक संकटात सापडला आहे. त्यामुळे नागरिकांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. लॉकडाउनमुळे राज्यातील वन्यजीव पर्यटन व्यवसायास सुमारे 60 टक्के फटका बसला आहे. वन्यजीव पर्यटनात सर्वाधिक पर्यटकांचा कालावधी हा एप्रिल ते जून असा असून, त्यानंतर पावसाळ्यात अभयारण्ये बंद असल्याने व्यवसाय ठप्प असतो. त्यामुळे यावर्षी वन्यजीव पर्यटन व्यवसायातील महत्त्वाच्या काळातील उलाढालीवर पाणी सोडावे लागले आहे.

लॉकडाउनपुर्वी मार्चच्या दुसर्‍या आठवडयात वन्यजीव पर्यटनावर बंदी घालण्यात आली. तर वन्यजीव पर्यटन पुढील आदेश येईपर्यंत बंदच ठेवण्याचे निर्देश राज्याच्या वनविभागाने नुकतेच दिले आहेत. त्यामुळे वर्षांतील सर्वाधिक काळ पर्यटक असणार्‍या या काळातच व्यवसाय ठप्प झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. व्याघ्र पर्यटनासाठी एप्रिल ते जून याकालावधीत पूरक असणार्‍या विदर्भातील ताडोबा, पेंच, मेळघाट, नवेगाव-नागझिरा, टिपेश्वर या व्याघ्रप्रकल्प आणि अभयारण्यांमध्ये पर्यटकांची गर्दी सर्वाधिक असल्याचे वन्यजीव पर्यटन व्यावसायिकांनी सांगितले.

एप्रिल ते जून या काळातील व्याघ्र पर्यटकांची संख्या सुमारे सव्वा लाख इतकी आहे. या काळात वन खात्यास प्रवेश शुल्क माध्यमातून मिळणारा महसूल सुमारे चार ते साडेचार कोटी रुपये वर्षांतील एकूण महसुलाच्या निम्मा असतो. पर्यटकांसाठी हॉटेल व्यवस्था, सफारीसाठी वाहन, वन्यजीव मार्गदर्शक या बहुतांश सुविधा स्थानिक पातळीवरील मनुष्यबळाच्या माध्यमातून पूर्ण होतात. राज्यातील महत्त्वाच्या व्याघ्र पर्यटनाच्या ठिकाणी मिळून दिवसाला सुमारे 200 सफारी होत असल्याचे वनाधिकार्‍यांनी सांगितले. याच्या किमान दुप्पट संख्येने वाहन चालक-मालक आणि वन्यजीव मार्गदर्शकांची संख्या वन्यजीव पर्यटनावर अवलंबून आहे.