‘अवनी’पीडित मागणार जगण्याचा अधिकार

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – अवनी वाघिणीला ठार मारण्यावरून राजकारण पेटले असतानाच बोराटी येथे आज, रविवारी ‘अवनी’पीडित सरकारकडे जगण्याचा अधिकार मागणार आहेत. ‘आमची आई, बाबा परत द्या’ असे फलक घेऊन मागण्यांकडे लक्ष वेधणार आहेत.

यवतमाळ जिल्ह्यातील सराटी, लोणी, बंदर, सावरगाव, वरंध, घुबडहेटी, सुभानहेटी, झाडगाव, मोहदा, जिरामिरा, वाढोणा, झोटिंगधरा, काहीगाव, कासार, चिखलदरा, कृष्णापूर, खेमकुंड व पळसकुंड परिसरातील शेकडो शेतकरी दोन वर्षांपासून रोजगार हिरावल्याने सरकारला मागणीपत्र देणार आहेत. मानव-वन्यजीव संघर्षावर तोडगा या मेळाव्याच्या माध्यमातून निघावा यासाठी पालकमंत्री मदन येरावार, सहपालकमंत्री संजय राठोड, आमदार डॉ. अशोक उईके, माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, शिवाजीराव मोघे यांच्यासह सर्व खासदार, आमदार, जनप्रतिनिधी आणि अधिकारी यांना या मेळाव्यात आमंत्रित करण्यात येणार आहे, अशी माहिती वन्यप्राणीग्रस्त शेतकरी मेळाव्याचे संयोजक किशोर तिवारी यांनी दिली.

अवनी वाघिणीने बळी घेतलेल्या कुटुंबांना सरकारी नोकरी द्यावी, सरसकट प्रती कुटुंब दोन लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात यावी, वन्यप्राण्यामुळे पिकाची नुकसान भरपाई देण्याचे निकष बदलावे, सरसकट प्रती हेक्टरी ५० हजार देण्याचा कायदा करण्यात यावा, अशा त्यांच्या मागण्या आहेत.

Loading...
You might also like