हल्लेखोर वाघिण जेरबंद, मुख्यमंत्र्यांकडून वन अधिकारी, कर्मचार्‍यांना शाबासकी !

पोलिसनामा ऑनलाईन – यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनक्षेत्रातील दहशत माजविणार्‍या वाघिणीला वन विभागाच्या अधिकार्‍यांनी काल मोठ्या शिताफीने जिवंत पकडले आहे. याबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सबंधित वन अधिकारी व कर्मचार्‍यांचे कौतुक केले आहे.

वनपरिक्षेत्रातील परिसरात दहशत माजविलेल्या वाघिणीने गेल्या 2 महिन्यात माणसे, जनावरे यांच्यावर हल्ले केले होते. मुख्यमंत्र्यांनी स्वत: याची दखल घेऊन वनविभागाच्या अधिकार्‍यांना वाघिणीस जिवंत पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्याप्रमाणे वन विभागाने सापळा लावून तिला पकडले. या वाघिणीला नागपूर येथे अस्थायी उपचार केंद्रात हलविण्यात आले आहे. वाघिणीचा अंधारवाडी, वासरी, कोपामांडवी, कोब्बई परिसरात संचार होता. तिने हल्लेही करावयास सुरुवात केली होती. यामध्ये एक जण जखमी तर एका महिलेचा मृत्यू ओढविला होता. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या सूचनेनुसार मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धतीनुसार समितीची एक बैठकही पार पाडण्यात आली होती त्याप्रमाणे पांढरकवडा वन विभागाच्या पथकांनी पथके तयार करून शोध सुरु केला होता. या परिसरात 29 कॅमेरे लावण्यात आले होते. मानद वन्य जीव रक्षक डॉ रमजान विराणी यांनी सादर केलेल्या कॅमेरा फुटेजमध्ये तसेच इतर कॅमेर्‍यात आलेल्या चित्रीकरणात या वाघिणीचा वावर दिसला होता. त्यानंतर तिच्यावर पाळत ठेवून बेशुद्ध करून जेरबंद करण्यास पथकांना यश आले.