वाघानेच केली वाघिणीची शिकार 

भोपाळ (मध्य प्रदेश) : वृत्तसंस्था- मध्य प्रदेशातील कान्हा नॅशनल पार्कमधून अचंबित करणारी घटना समोर आली आहे. एका प्रौढ वाघाने म्हाताऱ्या वाघिणीची शिकार करून तिचे मांस खाण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. वाघ कधीही वाघाला आपले सावज बनवित नाही आणि त्याचे मांसही खात नाही. असे असतानाही अशी घटना घडणे हे धक्कादायकच आहे. याबाबत बोलताना, ही घटना दुर्मिळ असल्याचे कान्हा नॅशनल पार्कच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

नॅशनल पार्क असो किंवा जंगल असो जिथे जिथे वाघांचे वास्तव्य असते तिथे तिथे प्रत्येक वाघाचे ज्याचे त्याचे क्षेत्र निश्चित असते. मग आपापल्या क्षेत्रात आपले वर्चस्व निश्चित करण्यासाठी वाघांमध्ये लढाईदेखील होते. मग यात वाघाच जीवही जातो. अशाच प्रकारे आपल्या क्षेत्रात वर्चस्व सिद्ध करण्यासाठी झालेल्या लढाईत प्रौढ वाघाने म्हाताऱ्या वाघिणीला मारले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

पार्कमध्ये देखरेख ठेवणारे पथक शनिवारी कान्हा नॅशनल पार्कमध्ये गेल्यानतंर त्यांना वाघिणीचा मृतदेह मिळाला. तो छिन्नविच्छिन्न अवस्थेत होता. मृत वाघिणीच्या  डोक्याची कवटी आणि केवळ पंजे मिळाले आहेत. तर वाघिणीच्या शरिराचा अन्य भाग खाऊन टाकला आहे अशी माहिती समोर आली आहे. प्रौढ वाघाने म्हाताऱ्या वाघिणीची शिकार करून तिला खाल्याने वन अधिकारी चक्रावून गेले आहेत. कान्हा नॅशनल पार्क हे वाघांसाठी राखीव क्षेत्र आहे. येथे वाघांची संख्या अधिक आहे.

याबाबत कान्हा नॅशनल पार्कचे संचालक के. कृष्णमूर्ती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशी घटना यापूर्वी कधीही घडली नव्हती असे त्यांनी सांगितले आहे. नॅशनल पार्कमध्ये शिकार करण्यासाठी अन्य प्राणी उपलब्ध असताना वाघाने वाघिणीची शिकार करून तिला खाऊन टाकले ही जरा विचित्र घटना असल्याचेही त्यांनी सांगितले.