‘तिहार’ तुरुंगात कैद्याची टॉयलेटमध्ये ‘गळफास’ लावून ‘आत्महत्या’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चोरीच्या गुन्ह्यामध्ये तिहार तुरुंगामध्ये असलेल्या कैद्याने तुरुंगातील टॉयलेटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना आज सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली. गगन असे या कैद्याचे नाव असून तो तिहार तुरूंगाच्या 3 नंबरच्या कोठडीत बंद होता. गगन विरोधात चार प्रकरणे प्रलंबित आहेत. त्याला चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती.

गगन याने आज सकाळी तुरुंगातील टॉयलेटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार दहाच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनासास्थळी धाव घेतली. त्यानंतर डॉक्टरांना बोलावण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषीत केले. कैद्याने आत्महत्या करण्यामागचे कारण समजू शकले नाही. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ऑटोप्सीनंतर त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांना सोपवण्यात येणार असल्याचे तुरुंग प्रशासनाने सांगितले.

दरम्यान, तिहार तुरुंगामध्ये ऑगस्ट 2019 मध्ये चंद्रभान नावाच्या कैद्याने अशाच प्रकारे गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानेही तुरुंगातील शौचालयात गळफास लावून आत्महत्या केली होती. चंद्रभान हा आरोपी खुनाच्या गुन्ह्यात तिहार तुरूंगात होता. त्याच्याही मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. त्यातच आता गगन नावाच्या कैद्याने तुरुंगातील शैचालयात गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.