TikTok वर ‘अरे पकडनेकी बात छोड अपुन को टच भी नहीं कर सकता’ म्हणणारा गोत्यात

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – दहशत निर्माण करण्यासाठी संजय दत्तच्या चित्रपटातील एका डायलॉगवर हातात कोयते घेऊन टिक टॉक व्हिडीओ करणं चार युवकांना चांगलच महागात पडलं आहे. ‘अरे पकडनेकी बात छोड अपुन को टच भी नहीं कर सकता’ म्हणणाऱ्या ४ टिक टॉक वीरांवर सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर त्यातील २ जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

अभिजीत संभाजी सातकर (वय २२), शंकर संजय बिराजदार (वय १९, पिंळे निलख) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर याप्रकऱणी त्यांच्या एका अल्पवयीन साथीदारासह जीवन रानावडे या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय दत्तच्या एका चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग आहे. अरे पकडनेकी बात छोड अपुन को टच भी नहीं कर सकता या प्रसिध्द डायलॉगवर पिंपळे निलख येथील तरुणांनी हातात कोयते घेऊन टिक- टॉक अॅपवर व्हिडिओ तयार केला होता. मात्र हा व्हिडीओ पोलीस कर्मचारी पिसे यांच्या हाती लागला. त्यानंतर त्यांनी व पोलीस उपनिरीक्षक साळुंखे यांनी कर्मचाऱ्यांसह तपासाला सुरुवात केली. अखेर पोलिसांनी या व्हिडिओतील चौघांपैकी दोघांचा शोध लागला. परंतु त्यांचा अल्पवयीन साथीदार आणि आणखी एक तरुण यांचा शोध पोलीस घेत आहेत. या सर्वांवर आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे,गुन्हे पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.