भारतानं 59 चिनी ऍप्सवर बंदी घातल्याने चिंतेत China, App कंपन्यांना होतेय कोट्यवधींचे नुकसान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हिंसक चकमकीनंतर भारत आणि चीनमधील तणाव वाढला आहे. अलीकडेच भारताने चीनच्या ५९ ऍप्सवर बंदी घातली आहे. त्यानंतर चीन अस्वस्थ झाला आहे. चीनने आता हे मान्य केले आहे की, भारतात बंदी घातल्यानंतर टिकटॉकची मूळ कंपनी बाईटडान्सला कोट्यवधी डॉलर्सचे नुकसान होऊ शकते. गेल्या महिन्यात लडाखमध्ये लाईन ऑफ ऍक्चुअल कंट्रोलवरील हिंसक संघर्षानंतर भारत सरकारने ५९ ऍप्सवर बंदी घातल्यामुळे टिकटॉकची मूळ कंपनी बाईटडान्सला ६ अब्ज डॉलर्सचे नुकसान होऊ शकते, असे चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने ट्विट केले.

ऍप्सवरील बंदीने भारतीय आयटी प्रोफेशनलला नुकसान होईल- ग्लोबल टाईम्स
यापूर्वी ग्लोबल टाईम्सने ट्विटरवर इशारा दिला होता की ऍप्सवरील या बंदीमुळे भारतीय आयटी व्यावसायिकांचे नुकसान होईल, तसेच दोन्ही देशांमधील तणाव वाढेल. चीनच्या सत्ताधारी पक्षाचे मुखपत्र असलेल्या या वृत्तपत्राने म्हटले आहे की, टिकटॉक आणि शेअरइट इत्यादी जागतिक अ‍ॅप्सवर बंदी आणल्याने केवळ या कंपन्यांवरच परिणाम होणार नाही, तर या कंपन्यांसाठी कार्यरत हजारो भारतीय आयटी कर्मचार्‍यांवरही त्याचा परिणाम होईल.

५९ चिनी ऍप्सवर बंदी आणण्याचा निर्णय जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचे उल्लंघन
यापूर्वी चिनी दूतावासाच्या वतीने सांगितले गेले की, भारताचा हा निर्णय जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचे उल्लंघन आहे. ५९ चिनी ऍप्सवर बंदी घालण्याच्या भारताच्या निर्णयाला अमेरिकेनेही पाठिंबा दर्शवला आहे. अमेरिकेने भारताच्या या कारवाईचे कौतुक केले आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ म्हणाले की, या निर्णयामुळे भारताच्या सार्वभौमत्व, अखंडता आणि राष्ट्रीय सुरक्षेला चालना मिळेल.