आम्ही चिनी सरकारला माहिती पुरविली नाही, TikTok चा खुलासा

पोलीसनामा ऑनलाईन टीम – केंद्र सरकारने 59 चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला असून यामध्ये टिकटॉकचाही समावेश आहे. वापरकर्त्यांची माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि नागरिकांची मागणी यांच्या आधारे बंदी घालण्यात आल्याचे माहिती तंत्रज्ञान खात्याने निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. बंदीची घोषणा कऱण्यात आल्यानंतर टिकटॉकने निवेदन जारी केले असून आम्ही चिनी सरकारला भारतीयांची माहिती दिलेली नाही असे म्हटले आहे.

भारत सरकारने 59 अ‍ॅप्स ब्लॉक करण्यासंदर्भात अंतरिम आदेश जारी केला असून यात टिकटॉकचाही समावेश आहे. आम्ही या आदेशाचे पालन करत आहोत. आम्हाला याबाबत सरकारच्या संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांशी बैठकीचे निमंत्रण आले असून या बैठकीत आम्हाला आमची बाजू मांडण्याची व स्पष्टीकरण देण्याची संधी मिळणार आहे. डेटा प्रायव्हसी व डेटा सिक्युरिटीबाबतच्या सर्व भारतीय अधिनियमांचे टिकटॉक काटेकोरपणे पालन करत असून आमच्या भारतातील वापरकर्त्यांची कोणतीही माहिती आम्ही कोणत्याही परदेशी सरकारला दिलेली नाही, चिनी सरकारलाही नाही. भविष्यात आमच्याकडे अशी मागणी करण्यात आली, तरीही आम्ही अशी माहिती कोणत्याही परिस्थितीत देणार नाही. आमच्या दृष्टीने वापरकर्त्यांची गोपनीयता व अखंडता याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे टिकटॉक इंडियाचे प्रमुख निखिल गांधी यांनी म्हटले आहे.

टिकटॉकने 14 भारतीय भाषांमध्ये सेवा देत इंटरनेटमध्ये लोकशाहीच आणली आहे. यात कोट्यवधी सामान्य वापरकर्ते, कलाकार, गोष्टी सांगणारे, शिक्षणक्षेत्रातील मंडळी, व टिकटॉकच्या माध्यमातून उदरनिर्वाह चालवणार्‍या असंख्य लोकांचा समावेश आहे. यातले अनेकजण तर पहिल्यांदाच इंटरनेटचा वापर करणारेही आहेत, असेही त्यांनी सांगितले.

देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक असलेले घटक या माहितीचा गैरवापर करीत असून त्याद्वारे देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचत आहे. ही अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब असून त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने बंदीचे आदेश जारी करताना म्हटले आहे.