कोलवडी केसनंद रस्ता मार्च अखेर पूर्ण होणार

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – अष्टविनायक रस्ते विकास अंतर्गत लोणीकंद थेऊरफाटा रस्ता रुंदीकरणाचे काम चालू असून पहिल्या टप्प्यातील काम मार्च अखेर पूर्ण करणार असल्याचे प्रकल्प व्यवस्थापक नितीन पाटील व प्रकल्प इन्चार्जार ज्ञानेश्वर गुंजाळ यांनी सांगितले. या कामात वाहतूकीचा मोठा अडथळा होत असून जड वाहतूक इतर ठिकाणी वळवली तर कामाला आणखी गती येईल. हे काम तीन टप्प्यांत होणार असून पहिला टप्पा केसनंद कोलवडी दरम्यान असून हे काम येत्या महिनाभरात करण्यात येईल असे ते म्हणाले.

अष्टविनायक रस्ते विकास प्रकल्पाअंतर्गत विस्तारीकरण प्रकल्पाअंतर्गत लोणीकंद थेऊरफाटा या राज्य महामार्ग क्र 58 चे रुपांतरण पी एन 33 पी सी आय एल अष्टविनायक थेऊर प्रा.लि.असे केले आहे. यासाठी राज्य शासनाने 161 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. हे काम दोन वर्षात पूर्ण करावयाचे आहे. काम सुरु होण्यास थोडा वेळ लागला परंतु आता या कामाने गती घेतली आहे. पहिल्या टप्प्यात केसनंद कोलवडी या दरम्यान काम पूर्ण केले जाईल. यासाठी अनेक ठिकाणी रुंदीकरण करत असताना येणारी घरे दुकाने नागरिकांनी सहकार्य करत मागे घेतली. कोणत्याही वादाशिवाय हे रुंदीकरणाचे काम चालू आहे. लवकरच हा टप्पा पार करून थेऊरगांव पासून थेऊरफाटा पर्यंतचा दुसरा टप्पा हाती घेतला जाईल.

या रस्ता रुंदीकरणात अनेक ठिकाणी बंदिस्त गटारे, पिण्याच्या पाण्याची वाहीनी, विज वाहक वाहिन्या स्थलांतरामुळे थोडा विलंब लागत होता महावितरण कडून परवानगी मिळाल्यानंतर हे काम युध्दपातळीवर हाती घेऊन पूर्ण केले जात आहे. सध्या कोलवडी येथील मुळा मुठा नदीवरील पुल ते केसनंद येथील जोगेश्वरी पर्यंतचा साडे सहा किलो मिटरच्या टप्प्याचे हे काम चालू आहे यामध्ये केसनंद चौकातील आठशे मिटरचे सिमेंट काॅक्रीटचाही समावेश आहे यातील एक बाजू दि.15 मार्च पर्यंत तर दुसरी बाजू मार्च अखेर पूर्ण करणार आहेत.