रामजन्मभूमीच नाही तर  ‘या’ ठिकाणीही ठेवण्यात आली आहे ‘टाईम कॅप्सूल’

पोलिसनामा ऑनलाईन – अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीला लवकरच सुरुवात होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर मंदिर निर्माण करत असताना मंदिराच्या 200 फूट खाली एक ‘टाइम कॅप्सूल’देखील ठेवण्यात येणार आहे. यापूर्वीही देशात काही ठिकाणी टाईम काही महत्त्वाच्या ठिकाणांच्या खाली टाईम कॅप्सूल ठेवण्यात आली होती. लाल किल्ल्यातही जमिनीच्या 32 फूट खाली एक टाईम कॅप्सूल ठेवण्यात आली आहे.  वर्तमानकालीन महत्त्वाच्या घटनांची नोंद असलेली कागदपत्रे आणि इतर वस्तू असलेली जमिनीत पुरुन ठेवलेली कुपी कालकुपी भावी पिढ्यांना उत्खननानंतर सद्यःस्थितीची माहिती व्हावी हा त्यामागील हेतू असतो.

आगामी पीढीला मागील काळात काय घडले याची माहिती व्हावी हा टाईम कॅप्सूल जमिनीखाली ठेवण्यामागील मुख्य उद्देश असतो. केवळ लाल किल्ल्यातच नाही तर देशात अशी अनेक ठिकाणे आहेत ज्या ठिकाणी जमिनीखाली टाईम कॅप्सूल ठेवण्यात आल्या आहेत. आयआयटी कानपूरच्या 50 वर्षांच्या इतिहासाची माहितीदेखील टाईम कॅप्सूलद्वारे जमिनीखाली ठेवण्यात आली आहे. तत्कालिन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी ही टाईम कॅप्सूल जमिनीखाली ठेवली होती. या टाईम कॅप्सूलमध्ये आयआयटी कानपूरचे संशोधन आणि शिक्षकांशी निगडीत माहिती ठेवण्यात आली होती. याव्यतिरिक्त चंद्रशेखर आझाद कृषी विद्यापीठाच्या इतिहासाचीही माहिती अशाचप्रकारे टाईम कॅप्सूलमध्ये ठेवण्यात आली आहे. टाईम कॅप्सूलला मोठा इतिहास आहे. ही संकल्पना केवळ भारतातच नाही. 30 नोव्हेंबर 2017 रोजी स्पेनमध्ये 400 वर्ष जुनी टाईम कॅप्सूल सापडली होती. यामध्ये एक मूर्तीच्या आत काही कागदपत्रे ठेवण्यात आली होती. त्यामध्ये 1777 च्या आसपासचे आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक घटनांबाबतची माहिती होती.