आता कोरोना लसीकरण 24 तास खुले; लसीकरणासाठी वेळेची मर्यादा नाही – आरोग्यमंत्री हर्षवर्धन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारने कोरोना विरोधी लस देण्याची गती वाढविण्यासाठी दिलेली अंतिम मुदत संपविली आहे. आता नागरिकांना त्यांच्या सोयीनुसार केव्हाही लस घेता येणार आहे. तसेच लीसकरण हे 24×7 अशा प्रकारे सुरूच राहणार आहे. याअगोदर 1 मार्चपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू होणार होता. तेव्हा प्रत्येक केंद्रावर सकाळी 9 ते संध्याकाळी 3 वाजेपर्यंत लसीकरणासाठी वेळ निश्चित करण्यात आला होता. मात्र, आता अशी वेळेची मर्यादा सरकारने हटविली आहे.

आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ट्विट करत असे म्हंटलं आहे की, लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी सरकारने वेळ मर्यादा दूर केल्या आहेत. देशातील नागरिक आता त्यांच्या सोयीनुसार 24×7 लसीकरण करु शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नागरिकांच्या आरोग्याचे आणि त्यांच्या काळाचे मूल्य समजले आहे.

आतापर्यंत 1.54 कोटी जणांना दिली कोरोना लस
आतापर्यंत कोरोना लस 1.54 कोटी डोस लाभार्थ्यांना दिली आहे. या आकडेवारीत मंगळवारी दिलेल्या 6,09,845 डोस इतके आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आपल्या तात्पुरत्या आकडेवारीत ही माहिती दिली आहे. कोरोनाचा नायनाट करण्यासाठी देशव्यापी लसीकरण मोहीम 16 जानेवारीपासून सुरू केली असून प्रथम आरोग्य कर्मचार्‍यांपासून लसीकरणास सुरूवात झालेली आहे. त्याचबरोबर 2 फेब्रुवारीपासून जवानांना लस देऊन लसीकरण केले आहे.

त्यानंतर, 1 मार्चपासून 60 वर्षांवरील आणि 45 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या गंभीर आजारांपासून ग्रस्त असलेल्या लोकांना लस देऊन लसीकरण सुरू झाले आहे. मंत्रालयाने असेही म्हटले आहे की, संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार आतापर्यंत लसच्या एकूण 1,54,61,864. डोस दिलेले आहेत.

यात 600 वर्षांहून अधिक वयाचे 434981 लाभार्थी आणि गंभीर आजार असलेले 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 60020 लाभार्थ्यांचा समावेश आहे. मंत्रालयाच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, लसीकरणाच्या 46 व्या दिवशी मंगळवारी संध्याकाळी 7 पर्यंत एकूण 6,09,845 लोकांना लस डोस देण्यात आला. यापैकी 5,21,101 लाभार्थ्यांना प्रथम डोस देण्यात आला, तर 88,744 आरोग्य कर्मचार्‍यांसह इतरांनाही दुसरा डोस देण्यात आला आहे.

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशात तयार केलेली लस अनेकांना देण्यात येत आहे. यासाठी जिल्हा, राज्य आणि देश पातळीवर कोरोना लस देण्यासाठीची लसीकरण मोहिम राबविली जात आहे. तसेच हि लस अगोदर आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच वयस्कर नागरिकांसह इतरांनाही दिली जात आहे. सरकारने लस कोठे कोठे उपलब्ध होईल, याबाबत लस मिळणारी रुग्णालयांची यादी दिलेली आहे. त्याठिकाणी नागरिकांना कोरोना लस दिली जात आहे.