दिल्ली हिंसाचार : ‘सरकारनं मला ‘बडतर्फ’ केलं असतं तरी मी जाफराबाद जळू देणार नव्हतो’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – उत्तर पूर्व दिल्लीचा जाफराबाद, सीलमपुर, ओल्ड मुस्तफाबाद, भजनपुरा, चांद बाग इत्यादी भाग मागील 24-25 फेब्रवारीला अचानक पेटला नाही. याची सुरूवात शाहीन बागमधून सुरू झाली आहे. जर मी दिल्लीचा पोलीस कमिश्नर असतो तर शाहीन बागमध्ये रस्त्यावर बसणार्‍यांना पहिल्याच दिवशी रस्त्यावरून उचलून पार्कमध्ये बसवले असते. काही जरी झाले असते, तरी जाफराबाद इत्यादी भागात दंगलीची आग लागू दिली नसती. सरकारने मला बाहेर काढले असते तरी चालले असते.

दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त अजय राज शर्मा यांनी हे वक्तव्य केले आहे. अजय राज शर्मा यूपी कॅडर 1966 बॅचचे माजी आयपीएस आणि एन्काउंटर स्पेशलिस्ट आहेत. अजय राज दिल्लीचे माजी पोलीस कमिश्नर आणि सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) सेवानिवृत्त महासंचालक आहेत.

जर तुम्ही दिल्ली पोलीस दलाचे यावेळी कमिश्नर असतात तर काय केले असते? असा प्रश्न विचारला असता शर्मा म्हणाले, ज्या दिवशी 50-100 लोक शाहीन बागमध्ये रस्ता आडवून बसले होते, मी त्याच दिवशी सर्वांना रस्त्यावरून उचलून पार्कमध्ये ठेवले असते. सर्वसामान्यांचा रस्ता आडवण्याच काय अर्थ आहे?

दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त म्हणाले, सत्य हे आहे की, उत्तर पूर्व दिल्लीत हिंसाचार 24-25 फेब्रुवारीला अचानक पसरला नाही. याचे मुळ शाहीन बाग आहे. जर शाहीन बाग तयार झाले नसते, तर दिल्लीत कोणताही हिंसाचार झाला नसता. प्रथम शाहीन बागचे ठिकाण तयार झाले. त्यांनतर दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी ज्या नेत्याच्या मनात जे आले ते उलट-सुलट बोलले गेले. बेधडकपणे काहींनी गोळी मारण्याची भाषा वापरली.

अजय राज शर्मा म्हणाले, मी जो काही मीडिया पाहिला आहे, ऐकला आहे त्यानुसार तर दिल्लीच्या या दंगलीत पोलिस मूकदर्शक बनले होते. कारण काय होते हे दिल्ली पोलीस आणि सत्ताधारी यांना माहित आहे. मला वाटते की, पोलीस कोणत्या तरी दबावाखाली आणि कोणत्यातरी भ्रमात होते. जसा धार्मिक भावनांचा घडा भरला, असामाजिक तत्वांनी हा घडा दंगलीच्या रूपाने फोडला.