अशाप्रकारे औषधांशिवाय देखील मायग्रेनपासून मिळवा आराम

पोलीसनामा  ऑनलाईन – अनेक वेळा लोकांना मायग्रेनमध्ये तीव्र प्रकारची डोकेदुखी उद्भवते. या मायग्रेनमुळे दैनंदिन व्यवहारांवरही परिणाम होतो. त्यामुळे मळमळ, उलटी, प्रकाश सहन होणे अशा प्रकारच्या समस्या निर्माण होतात. मायग्रेनपासून आराम मिळवण्यासाठी बाजारात अनेक औषधं उपलब्ध आहेत. मात्र काही लोकांवर या औषधांचे दुष्परिणामही होतात. झोप येणे, थकवा जाणवणे , हृदयाचे ठोके वाढणे, मळमळ अशा समस्या उद्भवतात. त्यामुळे औषधांशिवाय मायग्रेनपासून आराम मिळवण्यासाठी पर्यायी मार्गही आहे. खाली काही गोष्टी दिल्यात, त्या केल्या तर तुम्हाला मायग्रेनपासून थोडाफार का होईना आराम मिळेल.

१) थंड किंवा गरम पाण्याचा शेक
कपाळावर थंडावा घेणं किंवा मानेवर, डोक्याच्या मागे शेक घेणं यामुळे मायग्रेनमुळे निर्माण होणारी डोकेदुखी कमी होईल. एका कपड्यात बर्फ गुंडाळून किंवा गरम पाण्यात भिजवलेला कपडाही तुम्ही यासाठी वापरू शकता. १५-१५ मिनिटांच्या अंतरानं १५ मिनिटं ही प्रक्रिया करावी.

२) केस घट्ट बांधू नका
डोक्याच्या त्वचेवर जास्त ताण पडू देऊ नका. केस घट्ट बांधणे, हेडबँड यामुळे डोकेदुखी जाणवू शकते. डोकेदुखी उद्भवलेल्या महिलांनी केस सैल केल्यानंतर त्यांची डोकेदुखी कमी झाल्याचं एका संशोधनात दिसून आलं आहे.

३)कठिण, चिकट पदार्थ टाळा
च्युइंग गम हा चिकट असतो, तो चावताना ताण पडतो. याशिवाय नखं, ओठ, पेन चावणं अशा सवयींमुळे डोकेदुखी तीव्र होते. त्यामुळे या गोष्टी टाळा.

४) जास्त प्रकाश टाळा
जास्त प्रकाशामुळे मायग्रेनची समस्या जास्त होते. त्यामुळे घरात दिवसा जास्त सूर्यप्रकाश येत असल्यास खिडक्यांना पडदे लावा, बाहेर जाताना सनग्लासेसचा वापर करा , तसंच कॉम्प्युटर, टीव्हीसमोर अँटि ग्लेर ग्लास वापरा.

५) कॅफेनचं सेवन
कॅफेनचं सेवन करावं. यासाठी चहा किंवा कॉफी प्यावा. सकाळी लवकर उठल्यानंतर किंवा डोकेदुखी वाढत असून मायग्रेनची लक्षणं दिसू लागली की कॉफीचं सेवन करावं. मात्र जास्त प्रमाणातही कॉफी पिऊ नये, नाहीतर त्यामुळे दुसऱ्या समस्या उद्भवू शकतात. कॉफीला पर्याय म्हणून तुम्ही कॅफेन असलेला एखादा पदार्थही खाऊ शकता.