संगणकावर अजून प्रभावीपणे काम करायचंय ? तर मग घ्या ‘ही’ काळजी

पोलीसनामा ऑनलाईन टीम – बहुतांश कामाच्या ठिकाणी सध्या संगणक असतात. घरीसुद्धा संगणक सतत वापरणारे अनेकजण असतात. काहीजणांच्या कामाचे स्वरूपच असे की ते संगणकाशिवाय कामच करू शकत नाहीत. त्यामुळे किती थकवा आला तरी काम करतच रहावे लागते. संगणकावर शंभर टक्के चांगले काम कसे करायचे असल्यास आणि ताजेतवाने रहायचे असल्यास काही उपाय आहेत. हे उपाय केल्यास तुम्ही संगणकावर अधिक प्रभावीपणे काम करूनही नेहमीच ताजेतवाने राहू शकता.

सर्वात महत्वाचे म्हणजे कारण नसताना संकणकाचा वापरू नये. संगणकावर सलग न बसता तासा-दीड तासाने एक दोन मिनिटांसाठी उठावे आणि चार पावले चालून यावे. आणि पुन्हा कामाला सुरूवात करावी. कीबोर्ड, माऊस ९० अंशात हाताला येतील असे ठेवावेत. पाय खाली मोकळे, अधांतरी न ठेवता पायाला आवश्यक आधार असावा. संगणकावर काम करताना फोनला खांद्याने किंवा मानेने दाबून बोलू नये. अधिक काळ फोनवर बोलायचे असल्यास हेडफोनचा वापर करावा. काम करताना शरीर सैल आणि मन शांत ठेवावे.

प्रत्येक तीन-चार तासातून एकदा डोळ्यांवर थंड पाण्याचे झपके मारावेत. संगणकाच्या स्क्रीनच्या प्रकाशाचा त्रास होऊ नये यासाठी अँटिग्लेअर कोटिंग किंवा ग्लास लावावी अथवा ब्राइटनेस कमी ठेवावा. नियमितपणे व्यायाम, योगासने, प्राणायाम आणि त्राटक केल्यास आणखी फायदा होऊ शकतो. या गोष्टी केल्यास तुम्ही संगणकावर अधिक प्रभावीपणे करूनही नेहमीच ताजेतवाने राहू शकता