कोंडा, केसगळती, अकाली केस पांढरे होणं यामुळं वैतागलात ? गुणकारी काळ्या मिरीचा ‘असा’ करा वापर, मग बघा परिणाम !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  काळी मिरी हा गरम मसाल्यातील एक अविभाज्य घटक आहे. केसांच्या समस्येवर काळी मिरी हे गुणकारी औषध मानलं जातं. केसातील कोंडा, केस गळणं, यावर काळी मिरी फायदेशीर आहे. आज आपण काळ्या मिरीच्या फायद्यांबद्दल माहिती घेणार आहोत.

1) केसातील कोंडा – वातावरणातील बदल, आहार याचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर आणि केसांवर होतो. यामुळं केसात कोंडाही होतो. अनेकजण कोंड्याच्या समस्येनं त्रस्त असतात. यासाठी काळ्या मिरीच्या तेलानं केसांना मालिश करावी. यासाठी 300 ग्रॅम खोबरेल तेलात 3 ग्रॅम मिरपूड टाकून हे तेल चांगलं उकळून घ्यावं. त्यानंतर तेल गार झाल्यावर या तेलानं टाळूवर हलक्या हातानं मालिश करावी. साधारणपणे अर्ध्या एक तासानं कोमट पाण्यानं केस धुवून घ्यावेत. हा प्रयोग आठवड्यातून दोन तीन वेळा करावा.

2) अकाली केस पांढरे होणं – काळ्या मिरीत अँटी ऑक्सिडंट्स गुणधर्म असतात. त्यामुळं अकाली पांढरे झालेले केस पुन्हा काळे होण्यासाठी काळी मिरी फायदेशीर ठरते. त्यासाठी 3 चमचे दही, 1 चमचा मिरपूड एकत्र करून त्याची पेस्ट तयार करावी. त्यानंतर ही पेस्ट स्काल्पवर लावावी. एक तास झाल्यानंतर सौम्य शॅम्पूनं केस धुवावेत.

3) केसगळती कमी करून केसांच्या वाढीसाठी – अनेकांना केसगळतीची समस्या उद्भवते. या समस्येसाठी काळ्या मिरीचा फायदा होतो. जर केस गळत असतील तर ऑलिव्ह ऑईलमध्ये मिरपूड घालावी. किंवा त्यात 5-6 काळी मिरी घालावी. या तेलानं रोज डोक्यावर मालिश केली तर केसांची वाढ होते. तसंच केस मजबूत होतात.

4) केस मजबूत करण्यासाठी – केसांचं आरोग्य हे आपल्या हातात असतं. त्यामुळं केस निरोगी राहतील, त्यांना योग्य पोषण मिळेल याकडे आपणच लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळं केस मजबूत करण्यासाठी 4 चमचे लिंबाचा रस घेऊन त्यात 1 चमचा मिरपूड घालावी. हे मिश्रण केसांना लावावं. त्यानंतर एक तासानं केस स्वच्छ धुवावेत.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.