पत्नीच्या ‘अति’स्वच्छतेला कंटाळला पती, तिची हत्या करून केली आत्महत्या, नोटाही घ्यायची धुवून

म्हैसूर : वृत्तसंस्था – पत्नीच्या अतीस्वच्छतेला कंटाळून पतीने तिचा खून करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कर्नाटकमधील म्हैसूरमध्ये घडली आहे. मृत पतीचे नाव सत्यमुर्ती असून पत्नीचे नाव पुट्टमणी असे होते. या दोघांचे 15 वर्षांपूर्वी लग्न झाले होते, तसेच त्यांना दोन मुले आहेत. पुट्टमणी अती स्वच्छतेमुळे दिवसभरात अनेकदा मुलांना अंघोळ घालायची. एवढेच नव्हे तर घरी आणलेल्या नोटाही धुवून वाळत घालत होती. या सवयीवरून पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असत. याच वादातून पतीने पुट्टमणीची हत्या केली.

शेजार्‍यांनी सांगितले…
पुट्टमणीचे शेजारी प्रभू स्वामी यांनी सांगितले की, मागील 8 वर्षांपासून स्वच्छेतेच्या नावाखाली अंधश्रद्धा वाटाव्यात अशा अनेक गोष्टी पुट्टमणी करत होती. कुणीही तिच्याकडे गेल्यास ती प्रथम अंघोळ करुन या, असे सांगत असे. यामुळे अनेकांना त्यांच्याकडे जाण्याससुद्धा भिती वाटत होती.

नोटाही धुवून घ्यायची
तिची 7 आणि 12 वर्षांची दोन मुले घराच्या बाहेर जाऊन आल्यास पुट्टमणी त्यांना आंघोळ घालत असे. तसेच पतीने घरखर्चासाठी दिलेल्या नोटाही ती धुवून वाळत घालत असे. नंतरच या नोटांचा वापर ती करत होती. वेगवेगळ्या जातीच्या आणि धर्माच्या लोकांचे हात नोटेला लागलेले असल्याने त्या स्वच्छ केल्या पाहिजेत, असे तिला वाटायचे, असे या दांपत्याचे नातेवाईक राजशेखर यांनी सांगितले.

वादाचे कारण अती स्वच्छता
या दाम्पत्याचे नातेवाईक राजशेखर यांनी सांगितले की, सत्यमुर्ती याने मला पत्नीच्या विचित्र वागण्याबाबत सांगितले होते. स्वच्छतेच्या नावाखाली ती पतीचा आणि मुलांचा छळ करत होती. सतत अंघोळ केल्याने मुलेही वारंवार आजारी पडायची. परंतु, तिचे स्वच्छतेचे वेड काही कमी होत नव्हते. टॉयलेटला जाऊन आल्यावर, गुरांना चारा घातल्यानंतर तसेच बाहेरच्या व्यक्तीला स्पर्श केल्यानंतर पुट्टमणी मुलांना अंघोळ घालत असे. यावरुन सत्यमुर्ती आणि पुट्टमणी यांच्यात सतत भांडणे होत होती.

असा उघडकीस आला प्रकार…
अतिस्वच्छतेवरूनच या पती-पत्नीमध्ये मंगळवारी शेतातच जोरदार भांडण झाले. रागाच्याभरात सत्यमुर्तीने पुट्टमणीची कोयत्याने वार करुन हत्या केली. यानंतर तो घरी आला आणि गळफास लावून स्वता आत्महत्या केली. मुले सायंकाळी शाळेतून घरी आली असता त्यांना वडीलांचा मृतदेह पंख्याला लटकताना दिसला. घाबरलेल्या मुलांनी शेजार्‍यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर सुत्यमुर्ती यांना खाली उतरवण्यात आले, परंतु त्यांचा मृत्यू झाला होता. पुट्टमणीचा शोध घेतला असता तिचा मृतदेह शेतामध्ये सापडला.

शेजार्‍यांनी दिली माहिती..
या पती – पत्नीमध्ये मंगळवारी सकाळपासूनच जोरदार भांडण सुरू असल्याचे शेजार्‍यांनी पोलिसांना सांगितले. शेजारी राहणारे प्रभू स्वामी यांनी सांगितले की, पुट्टमणी सत्यमुर्तीला अंघोळ करण्यास सांगत होती. यावरुनच त्या दोघांमध्ये वाद सुरु झाला. नंतर शेतमाल विकण्यासाठी सत्यमुर्ती बाजारात गेला. तो परत आल्यानंतर त्याने मिळालेले पैसे पुट्टमणीकडे दिले असता तिने नोटा धुवून वाळत घातल्या. यावरून दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले. भांडतच दोघेजण शेतावर गेले. त्यानंतर त्यांच्या मृत्यूचीच बातमी समजली अशी माहिती स्वामी यांनी पोलिसांना दिली.