सर्वसामान्यांना 11 जूनपासून तिरुपती बालाजीचे दर्शन घेता येणार, तासाला फक्त 500 भक्त घेणार ‘दर्शन’, मार्गदर्शक तत्त्वे जारी

तिरुपती : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसने शिरकाव केल्यानंतर देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. लॉकडाऊनमध्ये देशातील सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली असून 8 जूनपासून धार्मिक स्थळे पुन्हा उघडण्यात येणार आहेत. याची तयारी सुरु झाली आहे. तिरुपती बालाजी मंदिरानेही ही तयारी जोरात सुरु केली आहे. शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार तिरुपती बालाजी मंदिराचे दरवाजे 8 जून पासून भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहेत. तिरुपती बालाजी मंदिर 20 मार्चपासून बंद आहे.

देशातील प्रसिद्ध व्यंकटेश्वर मंदिरात 8 जूनपासून तीन दिवसांचे ट्रायल सुरु होणार आहे. यानंतर भाविकांसाठी 11 जूनपासून मंदिर उघडणार आहे. मंदिरात दररोज सकाळी 6.30 ते सायंकाळी 6.30 पर्यंत 6 ते 7 हजार भाविक दर्शन घेऊ शकतील. तर यापूर्वी दररोज 60 ते 70 हजार भाविक दर्शन घेत होते. तिरुपती-तिरुमला देवस्थानचे अध्यक्ष वाय.व्ही. सुब्बारेड्डी यांनी सांगितल की, दर तासाला फक्त 500 भाविक दर्शन घेऊ शकतील. मंदिरात 10 वर्षाखालील लहान मुले व 65 वर्षे वयावरील वृद्धांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार नाही. अशाच प्रकारे कंटेन्मेंट झोनमधून आलेल्या भाविकांनाही प्रवेश प्रतिबंधित असेल.

भाविकांची व्यवस्था पाहणारे सर्व कर्मचारी पीपीई किट वापरतील. भाविकांच्या प्रवासाचा इतिहास पाहिला जाईल. दररोज 300 रुपये किंमतीचे 3 हजार तिकिटे विशेष दर्शनासाठी ऑनलाईन उपलब्ध राहतील. तर नि:शुल्क 3000 तिकिटे उपलब्ध असतील. मंदिरात कोरोना टेस्टसाठी कॅम्प घेण्यात येईल. ज्यामध्ये रोज 200 कर्मचाऱ्यांची आणि भाविकांची रँडम टेस्ट होईल.

ऑनलाईन तिकीट विक्री 8 जूनपासून सकाळी सुरु होईल.
डोंगरावर चढण्यापूर्वी सर्व वाहने सॅनिटाईझ केली जातील. तर बॅरिकेड्स दर दोन तासांनी सॅनिटाइझ करण्यात येतील. पायी मार्ग काही दिवसांसाठी बंदच राहिल. हुंडीजवळ भाविकांना हर्बल सॅनिटायझर उपलब्ध असेल. भाविकांना हुंडीला स्पर्श करता येणार नाही. अन्न प्रसाद मर्यादित भाविक घेऊ शकतील. प्रत्येक गेस्ट हाऊसमध्ये केवळ दोन भाविकांना राहण्याची सोय असेल. दोन दिवसांपेक्षा अधिक काळ त्यांना थांबता येणार नाही. तिरुमला येथे खासगी हॉटेल्स उघडण्याची अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. अनेक रीतिरिवांजांवर प्रतिबंध असेल. केशदान करण्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

मंदिराने जारी केले मार्गदर्शक तत्त्वे
1. मंदिर कर्मचाऱ्यांना 6 आणि 7 जून रोजी इंट्रानेटद्वारे दर्शनासाठी परवानगी मिळू शकते. 8,9 आणि 10 जूनच्या पहिल्या तीन दिवांत मंदिरातील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना दर्शनाची परवानगी दिली जाईल. मंदिरामध्ये 21 हजाराहून अधिक कर्मचारी आहेत.

2. 10 जूनपासून स्थानिक भाविकांना टोकन काऊंटर सुरु होईल. दर तासामध्ये केवळ 500 लोकांना परवानगी दिली जाईल.

3. 11 जूनपासून 3000 लोकांना 300 रुपयांचे व्हीआयपी दर्शन पास उपलब्ध असतील. त्याचे बुकिंग फक्त ऑनलाइन होईल. यासाठीचा ऑनलाइन कोटा 8 जूनपासून सुरु होईल. लोक त्यांच्या इच्छित तारखेनुसार तिकीटाचे बुकींग करु शकतात.

4. गावातून येणाऱ्या भाविकांना ऑनलाईन परवानगी घेणे बंधनकारक असेल. यासाठी ग्रामस्थांना पंचायत कार्यलयाकडून मदत केली जाईल.

5. व्हीआयपी दर्शन सकाळी 6.30 ते सकाळी 7.30 या वेळेत असेल. यासाठी व्हीआयपींना सेल्फ-प्रोटोकॉलमधून जावे लागेल. कोणतेही शिफारस पत्र दिले जाणार नाही.

6. मंदिरातील श्रीवारी हुंडीजवळ भाविकांना हँड सॅनिटायझर्स देण्यात येईल.

7. मंदिरात मास्क वापरणे, हातला सॅनिटाइज करणे, सामाजिक अंतर, थर्मल टेंम्परेचर इत्यादी करणे अनिवार्य आहे.

8. मंदिरातील भाविकांना धर्मशाळांमध्ये जी खोली देण्यात येईल, ती रिक्त झाल्यावर 12 तासानंतर दुसऱ्याला दिली जाईल. दर दोन तासांनी खोली स्वच्छ केली जाईल.

9. धर्मशाळांमधील खोल्या देखील सम-विषम पद्धतीने राखीव ठेवल्या जातील. जास्तीत जास्त दोन लोकांना एका खोलीत राहता येईल. 24 तासांपेक्षा जास्त वेळ खोली मिळणार नाही.

10. दर दोन तासांनी मंदिर स्वच्छ केले जाईल.

11. मंदिरात लग्नासाठी 50 हून अधिक लोकांना परवानगी दिली जाणार नाही.