करीना कपूर देणार ‘गुड न्यूज’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री करिना कपूर तिच्या चाहत्यांना पुन्हा एकदा ‘गुड न्यूज’ देणार आहे. आता हे वाचून तुम्हाला प्रश्न पडला असेल की, करिना पुन्हा एकदा आई होणार आहे का ? तर असे नाही. ‘गुड न्यूज’ या नावाचा करीनाचा नवीन चित्रपट येणार आहे. अभिनेता अक्षय कुमारसह ती या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने करिना आणि अक्षयची जोडी तब्बल ९ वर्षानंतर मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे.

या चित्रपटाची निर्मिती करण जोहरेने केली असून दिग्दर्शन राज मेहताने केले आहे. या चित्रपटाची कथा एका जोडप्याच्या भोवती फिरते. हे जोडपं अर्थात करिना आणि अक्षय आहे. लग्नानंतर दोघांना आई-बाबा होण्याची लागलेली ओढ, या भोवती चित्रपटाची कथा फिरते. पण काही कारणामुळे दोघांना मुल होत नाही. सरोगसीच्या माध्यमातून मूल होण्यासाठी त्यांना करावा लागणारा संघर्ष, सामाजिक आणि मानसिक त्रास या सगळ्याचा चित्रपटात समावेश आहे.

या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरूवात होणार आहे. चित्रपटाचे निर्माते करण जोहरने याबाबत टिवटही केले आहे. करिना आणि अक्षयची जोडी सिनेरसिकांमध्ये लोकप्रिय आहे. या आधी दोघांनी ‘ऐतराज’, ‘कम्बख्त इश्क’ आणि ‘गब्बर इज बॅक’ हे चित्रपट एकत्र केले आहेत.