राज्यात पहिलीच मोठी कारवाई ! भीती दाखवून विनाकारण ‘अ‍ॅडमिट’ करणार्‍या हॉस्पीटलला दणका, ठोठावला 16 लाखाचा दंड

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन –   रुग्णांना विनाकारण भीती दाखवून हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करून घेत आणि अव्वाच्या सव्वा बील आकारले म्हणून ठाणे महानगर पालिकेने ठाण्यातील दोन खासगी हॉस्पिटलला मोठा दणका दिला आहे. या खासगी हॉस्पिटलला पालिकेकडून 16 लाखांचा दंड आकरण्यात आला आहे. राज्यातील ही पहिलीच मोठी कारवाई आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांच्या हॉस्पिटल विरोधात तक्रारी येत होत्या त्याची शाहनिशा करुन ठाणे महानगरपालिकेने ही कारवाई केली आहे. कोणताही आजार नसताना ठाण्यातील ठाणे हेल्थ केअर आणि सफायर या दोन हॉस्पिटल्सनी 13 ठाणेकरांना दाखल करुन घेतले होते आणि त्यांच्यावर 7 दिवस उपचार करुन त्यांच्याकडून लाखोंची बिले आकारली होती. याबाबत ठाणे महानगर पालिकेकडे तक्रार आल्यावर ठाणे महानगर पालिकेने चौकाशी करुन या दोन हॉस्पिटल वर कारवाई केली.

अशा प्रकारे नागरिकांची पिळवणूक करणे आणि त्या हॉस्पिटलवर कारवाई होण्याची ही राज्यातील पहिलीच वेळ असून यामुळे आता विनाकारण उपचार करणाऱ्या हॉस्पिटल्सना चपराक बसेल. ठाण्यात यापूर्वी देखील अशा तक्रारारी आल्या होत्या. तसेच थायरो केअर नावाच्या एका लॅबला ठाणे महानगर पालिकेने स्वॅब टेस्ट न करण्याची नोटीस धाडली. काही लॅबने स्वॅब टेस्ट केल्या होत्या. मात्र त्यांचे अहवाल हे चुकीचे आल्याने नागरिकांना मनस्ताप झाला होता. ठाणे महानगर पालिका देखील अशा हॉस्पिटल आणि लॅबवर कारवाई करणारी राज्यातील पहिली महानगरपालिका ठरली आहे.