‘तृणमूल’ सोडून भाजपमध्ये आलेल्या नेत्याने चक्क व्यासपीठावरच कान पकडून काढल्या उठाबशा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निवडणूक आयोगाने देशातील पाच राज्यांतील निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यानंतर आता राजकीय वातावरण तापत आहे. अनेक नेतेमंडळी पक्षांतर करत आहेत. पश्चिम बंगालमध्येही नेत्यांच्या पक्षांतराचा सपाटाच सुरु आहे. यादरम्यान सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या नेत्याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नेत्याने व्यासपीठावरच कान पकडून उठाबशा काढल्या.

मिदनापूरमध्ये तृणमूल काँग्रेसचे नेते सुशांत पाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी ते म्हणाले, तृणमूलमध्ये राहून जे पाप केले. त्याची माफी मागत आहे. सुशांत यांनी व्यासपीठावरूनच कान पकडून उठाबशा काढल्या. त्यावेळी व्यासपीठावर भाजपचे दिग्गज नेते शुभेंदू अधिकारीही उपस्थित होते. त्यांनीही काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. पाल यांनी सांगितले, की मी आता पश्चाताप करत आहे. तुम्ही सर्वांनी मला माफ करा. मी ही एक शिक्षा स्वत: दिली आहे. जेव्हा त्यांना थांबण्याचा प्रयत्न केला गेला. तेव्हा त्यांनी तृणमूल कार्यकर्ता असताना जे काही पाप केले त्याचा पश्चाताप म्हणून मी हे केले.

सुशांत पाल म्हणाले, की ते भाजपमध्ये होते. मात्र, 2005 मध्ये लेफ्ट फ्रंट सरकारला हरवण्यासाठी टीएमसीमध्ये सामिल झाले होते. तसेच यापूर्वी आसनसोलचे माजी महापौर जितेंद्र तिवारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.