टीएमसी आमदार हत्या ; ‘या’ भाजप नेत्यासह ४ जणांविरूद्ध गुन्हा दाखल

कोलकाता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसचे आमदार सत्यजीत बिश्वास यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. नदिया जिल्ह्यात शनिवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी भाजपाचे नेते मुकुल रॉय यांच्यासह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चारपैकी दोन जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सत्यजीत बिश्वास हे कृशनगर मतदारसंघातील आमदार आहेत. बिश्वास हे फुलबाडी परिसरात आयोजित सरस्वती पुजेच्या कार्यक्रमासाठी गेले होते. पुजा सुरू असतानाच त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांना तात्काळ शक्तिनगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. परंतु, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टकरांनी सांगितलं.

बिश्वास यांच्या हत्येला भाजप जबाबदार असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. सत्यजीत यांची हत्या भाजपच्या सांगण्यावरून झाली, असा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. तसंच सत्यजीत यांच्या हत्येमागे भाजपच्या मुकूल रॉय यांचा हात आहे, असा आरोप तृणमूलचे जिल्हाध्यक्ष गिरीशंकर दत्ता यांनी केला आहे. तसंच तृणमूलमधील काही विश्वासघातकी लोकांनी भाजपला यासाठी मदत केल्याचा आरोपही तृणमूल काँग्रेसने केला आहे.

दरम्यान, पोलिसांनी भाजपाचे नेते मुकुल रॉय यांच्यासह चार जणांविरोधात एफआयआर दाखल केली आहे. तसच या चारपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय हंसखली पोलीस स्थानकाचे ठाणेदाराचेही निलंबन करण्यात आले आहे.