TMC खासदाराचं ‘वादग्रस्त’ विधान, अर्थमंत्री निर्मला यांची तुलना ‘नागीन’शी केली

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाष्य केले आहे. बांकुरा येथे टीएमसीचे नेते कल्याण बॅनर्जी यांनी अर्थमंत्र्यांची तुलना एका जाहीर सभेत ‘काळ्या नागिनी’शी केली. ते म्हणाले की, ज्या प्रकारे ‘नागिन’ (विषारी साप) चावल्यामुळे माणसे मरतात, त्याचप्रमाणे निर्मला सीतारमण यांच्यामुळेही लोक मरत आहेत. अर्थमंत्र्यांनी अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे आणि त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. निर्मला सीतारमण सर्वात वाईट अर्थमंत्री आहेत.

टीएमसी नेत्याच्या या वक्तव्यावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ममता बॅनर्जी यांचे आपल्या पक्षाच्या नेत्यांवर नियंत्रण नसल्याचे भाजपने म्हटले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पक्षाच्या नेत्यांवरील पकड गमावली असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला.

दरम्यान केंद्रीय महिला आणि बालविकास राज्यमंत्री देबाश्री चौधरी म्हणाल्या, तुम्हाला टीएमसीकडून काय अपेक्षा आहे? विशेषत: कल्याण बॅनर्जीसारख्या व्यक्तीकडून? ते खासदार आहेत, परंतु ते कधीही महिलांचा आदर करीत नाहीत. पहिल्या महिला अर्थमंत्री आणि माजी संरक्षणमंत्र्यांवर त्यांनी जे शब्द वापरलेले आहेत ते खूप निराशाजनक आहेत. त्या म्हणाल्या की, मी खासदार कल्याण बॅनर्जी यांना विचारू इच्छिते की तुम्ही ज्या ठिकाणी आपले भाषण करता. तेथे आपल्या मागे एका महिलेचे चित्र आहे आणि आपण त्यांना आपला नेता म्हणता. अशा परिस्थितीत एका महिला अर्थमंत्र्यांचा अपमान करणे लज्जास्पद आहे.