मौलवींना नुसरत जहाँचे उत्तर -‘कोणाच्या म्हणण्यानुसार नाव का बदलू ?’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ज्यांनी माझे नाव दिले नाही त्यांना माझे नाव बदलण्यास सांगण्याचा कोणताही अधिकार नाही. हे हिंदू आणि मुस्लिमांचे प्रकरण नाही. माझा मौलवींना संदेश आहे की त्यांनी विश्रांती घ्यावी. ही राजकारणाची नव्हे तर उत्सवाची वेळ आहे. अशा शब्दात तृणमूल कॉंग्रेसची (TMC) तरुण  खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ हिने देवबंदी उलेमांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दुर्गापूजा करतानाचे नुसरतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यावरून  नुसरतवर मुस्लीम धर्मगुरू नाराज झाले आहेत. त्यांनी यास इस्लामविरोधी म्हंटले आहे.

दुर्गापूजेनिमित्त कोलकात्यातील दुर्गाभवन येथे पती निखिल जैन यांच्यासोबत कपाळाला कुंकू लावून उपस्थित राहिलेल्या नुसरतवर मुस्लीम धर्मगुरू नाराज झाले आहेत. जर नुसरतला धर्माबाहेरील काम करायचे असेल, तर तिने आधी आपले नाव बदलले पाहिजे, असे देवबंदी उलेमांचे म्हणणे आहे. इस्लाममध्ये ईश्वराशिवाय इतर कोणाचीही पूजा करणे गैर समजले जाते. जर नुसरत जहाँला इस्लामच्या शिकवणीविरुद्ध जाणारी कामे करायची असतील, तर तिने प्रथम आपले नाव बदलले पाहिजे. अशा प्रकारे वागून ती इस्लाम धर्माचा अपमान का करत आहे, असा प्रश्न उलेमांनी विचारला आहे.

इस्लाम सोडून दुसऱ्या धर्मात लग्न केल्यामुळे देखील नुसरत जहाँ वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. हिंदू धर्माप्रमाणे कपाळावर कुंकू लावणे, तसेच लोकसभेत पाश्चिमात्य पेहरावात जाणे यावरूनही तिच्यावर मोठी टीका झाली होती.

Visit  :Policenama.com