‘पोस्टकार्ड’ युद्धामुळे केंद्राच्या तिजोरीला बसणार कोट्यवधीचा ‘फटका’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपच्या ‘जय श्रीराम’ आणि तृणमूलच्या ‘जय बांग्ला, जय काली’ या पोस्टकार्ड ‘युद्धा’चा फटका केंद्राच्या तिजोरीला बसणार आहे. कोट्यवधी रुपयांचा चुराडा या ‘पोस्ट कार्ड युद्धा’त होणार असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना डिवचण्यासाठी जय श्रीराम लिहिलेले पोस्ट कार्ड पाठवणे सुरू केले आहे. त्याचे उत्तर म्हणून तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी भाजपला जय बांगला जय काली लिहिलेले पत्र पाठवण्यास प्रारंभ केला आहे. मात्र या युध्दाचा ताण केंद्राच्या तिजोरीवर बसणार आहे. यामुळे केंद्र सरकारला कोट्यवधी रुपयांचा फटका बसणार आहे.

ममता बॅनर्जींना जय श्रीराम लिहिलेले 10 लाख पोस्ट कार्ड भाजप पाठवत आहे. तर प्रत्युत्तरादाखल तृणमूल भाजपला जय काली लिहिलेले 20 लाख कार्ड पाठविण्यास सुरुवात झाली आहे. पोस्ट खाते हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. केंद्र सरकार एक पोस्ट 50 पैशांना विकते. जर दोन्ही पक्षांनी एकमेकांना एकूण 30 लाख पोस्ट कार्ड पाठवली तर 50 पैशांच्या हिशोबाने केंद्र सरकारला कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. भाजप हे जय श्री रामचे कार्ड फक्त मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना पाठवत आहे. परंतु तृणमूलचे कार्यकर्ते हे जय बांग्लाचे कार्ड पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो, खासदार लॉकेट चॅटर्जी, अर्जुन सिंह, मुकुल रॉय आणि प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांना पाठवत आहेत.