TMC म्हणजे ‘ट्रान्सफर माय कमिशन’ – PM मोदी

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक येत्या 27 मार्चपासून सुरु होत आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी सत्ताधारी तृणमूल काँग्रेस, भाजप यांसारख्या पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार प्रचारसभांचा धडाका सुरु आहे. त्यातच भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल केला. TMC म्हणजे ‘ट्रान्सफर माय कमिशन’, असा टोला पंतप्रधान मोदींनी लगावला आहे.

पुरुलिया येथील प्रचारसभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह टीएमसीवर टीकास्त्र सोडले. पंतप्रधान मोदींनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘पश्चिम बंगालमधील जनता इतकी वर्षे चुकीच्या पद्धतीने सरकार चालवल्याची शिक्षा ममता बॅनर्जी यांना देईल. दीदी म्हणतात ‘खेला होबे’, पण भाजप म्हणते ‘विकास होबे’, ‘शिक्षा होबे’. यापूर्वी डावे आणि नंतर तृणमूल सरकारने पुरुलियामध्ये उद्योग येऊ दिले नाहीत. सिंचनासाठी ज्या पद्धतीने काम व्हायला हवे तसे होताना दिसत नाही’.

दरम्यान, पाण्याची कमतरता असल्याने रोज ज्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, याची मला कल्पना आहे. प्रभू श्रीराम आणि सीतामातेच्या वनवासाची ही भूमी साक्षीदार आहे. या भूमीवर सीताकुंड आहे. जेव्हा सीतामाता तहानेने व्याकूळ झाली होती, तेव्हा प्रभू श्रीरामांनी जमिनीवर बाण मारुन पाणी काढले होते अशी कथा आहे. मात्र, आता याच पुरुलियामध्ये पाण्याची समस्या असणे विडंबना आहे, असेही ते म्हणाले.