यशस्वी वकिल होण्यासाठी कायद्याचे परिपूर्ण ज्ञान असणे आवश्यक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- विद्यार्थ्यांना यशस्वी वकिल होण्यासाठी कायद्याचे परिपूर्ण ज्ञान असणे आवश्यक असल्याचे मत ज्येष्ठ विधि तज्ज्ञ अ‍ॅड. के. आर. शहा यांनी व्यक्त केले. श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या विधी महाविद्यालयात ‘ग्राहक संरक्षण कायदा’ या विषयावर एकदिवसीय राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विद्यार्थी विकास समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. भगवानराव साळुंखे, कारभारी मंडळाचे अध्यक्ष विकास गोगावले, अ‍ॅड. व्ही.एस. करकंडे, तानाजी घारे, विविध महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.

अ‍ॅड. के. आर. शहा पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांना सर्वोत्तकृष्ठ वकिल होण्यासाठी कायद्याचे ज्ञान पाहिजे. कायदा म्हणजे दोन रेषांमधील कायद्याचे वाचन तसेच न सांगितलेले ज्ञान व जसा कायदा केला गेला आहे त्याचप्रमाणे त्याचे वाचन केले पाहिजे असे उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील यांनी कार्यक्रमाची रुपरेषा व ग्राहकांचे मुलभूत हक्क व ग्राहक संरक्षण कायद्याचे विशिष्ट पैलूंवर प्रकाश टाकला. तर अ‍ॅड. भगवानराव साळुंखे यांनी ग्राहक संरक्षण कायदा १९८६ व यामध्ये होऊ घातलेल्या दुरुस्ती विधेयक २०१८ यामधील फरक स्पष्ट करुन सांगितला.

या परिसंवादामध्ये राज्य ग्राहक आयोग मुंबईचे सदस्य अ‍ॅड. संतोष काकडे, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण संघ ठाणे अध्यक्ष अ‍ॅड. शरद लडके, पुण्याचे ग्राहक तक्रार निवाणक संघाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. प्रणाली सावंत, पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. विनय उत्पात, शुभांगी दुनाके यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्य़क्रमाचे सुत्रसंचालन प्राध्यापक सिद्धकला भावसार यांनी तर आभार प्राध्यापक सुमीत टाक यांनी मानले.