‘भूगोला’ची परीक्षा चूकवण्यासाठी १३ वर्षाच्या मुलाने रचले ‘अपहरण’नाट्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भूगोलाची दहा गुणांची परीक्षा चुकवण्यासाठी एका १३ वर्षाच्या मुलाने स्वत:च्या अपहरणाचे नाट्य रचले. मात्र, पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याचे हे नाट्य फारकाळ टिकले नाही. अखेर त्याने भूगोलाची परीक्षा चुकविण्यासाठी हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली. त्याने स्वत:च्या अपहरणाचा बनाव केल्याचे समोर येताच पोलिसांना डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली.

नमाज पठण करून घरी परतत असताना रिक्षात बसलेल्या तिघांनी आपले अपहरण केले. घाटकोपरमध्ये पोहचताच एका आरोपीचा फोन खाली पडल्याने त्यांनी रिक्षा थांबवली याच संधाचा फायदा साधून आपण तेथून पळ काढल्याची माहिती त्याने रात्री उशारी पोलीस ठाण्यात आई-वडिलांसमोर दिली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत हा सर्व प्रकार उघडकीस आला.

सोहेल (वय-१३ रा. अंधेरी नाव बदलले आहे) या सातवीत शिकणाऱ्या मुलाने स्वत:च्या अपहरणाचे नाट्य रचले. त्याने पोलिसांना माहिती देताना सांगितले की, रविवारी रात्री पावणे आठच्या सुमारास नमाज पठण करून घरी येताना रसत्याच्या कडेला थांबलेल्या रिक्षातील तरुणांनी मला बोलावून घेतले. त्यांनी मला रिक्षामध्ये बळजबरीने कोंबून कुर्ला मार्गे ते पुढे निघाले. घाटकोपर गन्हे शाखेसमोर आलो असता एकाचा मोबाईल रिक्षातून खाली पडला. मोबाईल घेण्यासाठी त्यांनी रिक्षा थांबवली. याच संधीचा फायदे घेऊन मी पळ काढल्याचे त्याने सांगितले.

सहारा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुलाच्या सांगण्यावरून तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. घाटकोपर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना मुलगा रस्त्याने निवांतपणे चालत जात असताना दिसला. घाटकोपर गुन्हे शाखेपासून २०० मीटर अंतरावर बस पकडताने तो दिसला. त्यामुळे पोलिसांना त्याचा संशय आला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपले अपहरण झाल्याच्या मतावर तो ठाम होता. त्यामुळे अपहरणाचा उलघडा करण्यात पोलिसांनी आपली रात्र घालवली.

…अखेर अपहरणनाट्यामागील ‘भूगोल’ सापडला पोलिसांनी रात्री उशीरा सोहेलला विश्वासात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याने भूगोलाचा पेपर अवघड जात असल्याचे सांगितले. त्यामुळे त्याला घरच्यांकडून ओरडा खावा लागत होता. सोमवारी त्याचा भूगोलाची परीक्षा होती. ही परीक्षा टाळण्यासाठी त्याने हे अपहरणनाट्य घडवून आणले. हे तुला कसे सुचले ? असे विचारताच त्याने असे करण्याची कल्पना मित्राने दिली असल्याचे सांगितले. त्याने खरे कारण सांगितल्यावर पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला. मात्र, त्याने रचलेल्या अपहरणनाट्यामुळे पोलिसांची दमछाक झाली. या घटेत गुन्हा दाखल करण्यात आला नसून फक्त घटनेची नोंद करण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like