कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याचे सुडाचे राजकारण, आ. शिंदेंचा आंदोलनाचा इशारा 

सातारा : पोलीसनामा आॅनलाईन – राज्यातील भाजप सरकार सुडाचे राजकारण कर असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर ३९५ सारखे चोरी आणि दरोड्याचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी हे गुन्हे त्वरित मागे घ्यावेत, अन्यथा पुसेगाव पोलीस स्टेशनसमोर उपोषण आंदोलन करू, असा इशारा आ. शशिकांत शिंदे यांनी दिला आहे. सत्ताधाऱ्यांच्या सुडाच्या राजकारणाचा निषेध करण्यासाठी खटाव तालुका राष्ट्रवादीने पुसेगाव पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा काढला होता. यावेळी आ. शिंदे यांनी आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना विविध मागण्यांचे निवेदन मोर्चेकऱ्यांनी दिले.

तत्पूर्वी, आ. शिंदे म्हणाले, राजकारण, समाजकारण आणि व्यवसायात अनेक वर्षे काम करणाऱ्या आमच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सत्तेचा गैरवापर करुन पोलिसांवर दबाव टाकून हे षड्यंत्र रचण्यात येत आहे. रडीचा डाव खेळून राजकारणात यशस्वी होण्याची स्वप्ने कुणी पाहू नयेत. लोकशाही मार्गाने होणाऱ्या लढाईला आम्ही नेहमीच तयार आहोत. जिल्हा पोलीसप्रमुखांनी या प्रकरणात लक्ष घालून कोणतीही शहानिशा न करता आमच्या कार्यकर्त्यांवर दाखल केलेले चुकीचे गुन्हे त्वरित मागे घ्यावेत. खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवरच फौजदारी गुन्हे दाखल करावेत. भविष्यात असे चुकीचे प्रकार आम्ही सहन करणार नाही. या प्रकरणात चुकीचे गुन्हे मागे घेतले नाहीत तर उपोषण आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. जे दोषी असतील त्यांच्यावर जरुर कारवाई करा, मात्र समाजात अनेक वर्षे क्षेत्रात जबाबदारीने वावरणाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करू नका, असा इशारा आ. शिंदे यांनी दिला.

यावेळी उपस्थितांनी विविध मागण्यांचे निवेदन सपोनि विश्वजीत घोडके यांना दिले. राष्ट्रवादीने काढलेल्या निषेध मोर्चात कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, जि. प. सदस्य प्रदीप विधाते, तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, जगनशेठ जाधव, ॲड. विजयराव जाधव, पं. स. सदस्य संतोष साळुंखे, राम जाधव, सदाबापू जाधव, गणेश जाधव, राजेंद्र कचरे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

जाहिरात