…म्हणून ‘त्या’ पोलिसाने चक्क ३० किलो वजन केले कमी

मुंबई : पोलीसनामा आॅनलाइन – अभिनेता मिलिंद सोमण, आयपीएस अधिकारी रवींद्र सिंघल आणि कृष्णप्रकाश यांच्या पाठोपाठ आता विरार पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक शंकर उथळे यांचे नाव घेतले जाणार आहे. शंकर उथळे (वय ३९) यांनी मलेशिया येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत मलेशियामध्ये भारताचा तिरंगा ध्वज फडकाविला आहे. विशेष म्हणजे संपूर्ण जगभरात प्रसिद्ध अशा आयर्नमॅन या स्पर्धेत किताब पटकाविण्यासाठी शंकर उथळे यांनी चक्क ३० किलो वजन कमी केले. २ वर्षांपूर्वी शंकर यांचे वजन ९२ किलो होते.

पालघर जिल्हा पोलीस दलातील पोलीस नाईक शंकर शामराव उथळे यांनी १७ नोव्हेंबरला मलेशिया देशात पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करून ही अतिशय खडतर स्पर्धा पूर्ण करून आयर्नमॅनचा पुरस्कार मिळवला आहे. त्यामुळे भारतासह पालघर जिल्हा पोलीस दलाचे नाव उज्ज्वल केले असून संपूर्ण पालघर पोलीस दलाकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या यशात शंकर यांच्या पत्नी उज्वला यांचा  देखील महत्वाचा वाटा आहे. त्यांनी शंकर यांच्या डाएटवर कटाक्षाने लक्ष ठेवले होते. त्यामुळेच शंकर यांना ३० किलो वजन कमी करता आले. मागील वर्षांपासून शंकर हे या स्पर्धेसाठी तयारी करत होते. शंकर यांनी २९ आॅक्टोबर २०१७ रोजी कोल्हापूर येथे झालेल्या हाफ आर्यन ट्रायथलॉन ही स्पर्धा ७ तास ३७ मिनिटात यशस्वीपणे पूर्ण केली. त्यानंतर पॅरिसने भारतात एआयआर ही सायकल स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत शंकर उथळे यांनी २०० किमी अंतर १० तास १ मिनिट, वलसाड येथे ३०० किमी अंतर १७ तास १६ मिनिट, पुणे येथे ४०० किमी अंतर २५ तास आणि बडोदा येथे ६०० किमी अंतर ३८ तास ५६ मिनिट अशी सायकल न थांबता चालवून स्पर्धा पूर्ण करून सुपर रेंडोनियर हा किताब मिळविला आहे.
याआधी अभिनेता मिलिंद सोमण, आयपीएस अधिकारी रवींद्र सिंघल आणि कृष्णप्रकाश यांनी आयर्नमॅन हा किताब पटकाविला आहे.