चिल्लर ठेवण्यासाठी पीएमपी नव्या बॅंकेच्या शोधात : रोज होते एवढी चिल्लर जमा 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दैनंदिन तिकीट विक्रीतून रोज सुमारे दीड लाख चिल्लर रक्‍कम जमा होते.  सध्या दर चार ते पाच दिवसांनी बॅंकेकडून ही चिल्लर स्वीकारण्यात येते. पण त्यामध्ये पीएमपी प्रशासनाला काही प्रमाणात तोटा सहन करावा लागतो. परिणामी चिल्लर प्रश्‍नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आता प्रशासनाकडून पर्यायी बॅंकेचा शोध घेण्यात येत आहे. त्या संबंधी काही राष्ट्रीय बॅंकाकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत, अशी माहिती पीएमपीतील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

पीएमपी बसेसच्या दैनंदिन संचलनातून दररोज लाखो चिल्लर रक्‍कम प्रशासनाकडे जमा होते.  पीएमपीकडून दररोज जमा होणारी रक्‍कम पुणे कॅम्प परिसरातील  सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या खात्यात जमा केली जाते.

मात्र, दिनांक 4 ऑक्‍टोबरपासून बॅंकेने ही चिल्लर घेण्यास नकार दिला होता. तेव्हापासून पीएमपीकडून यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. यासाठी रिझर्व्ह बॅंकेशीही पत्रव्यवहार करण्यात आला. यानंतर रिझर्व्ह बॅकेने दिलेल्या आदेशानुसार बॅंकेने रक्‍कम स्वीकारण्यास सुरुवात केली. यामुळे येत्या काही दिवसांत पीएमपी नव्या बॅंकेशी व्यवहार सुरू करण्याची शक्‍यता आहे.
दोन बॅंकाकडून प्रतिसाद

पीएमपी प्रशासनाकडून काही राष्ट्रीयकृत बॅंकाकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहे. त्यानुसार दोन बॅंकाकडून पीएमपीला प्रतिसाद मिळाला आहे. यासाठी प्राथमिक पातळीवर दोन्ही प्रशासनात चर्चा देखील झाली आहे. मात्र, आणखी काही बॅंकाकडून कशापद्धतीने प्रतिसाद मिळतो हे पाहण्याचे काम सुरू असून यावर पुढील काही दिवसांत निर्णय होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.