भारतातील शिक्षकानं केली ‘कमाल’ ! फक्त 600 रूपयांत बनवलं ऑटोमॅटिक फेस शिल्ड, जाणून घ्या खासियत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना काळात सोशल डिस्टंसिंग राखणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. एका शिक्षकाला असे वाटले की जेव्हा शाळा उघडतील, तेव्हा मुलांमध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे फार कठीण जाईल. तेव्हा त्याने ते सुनिश्चित करण्यासाठी काम करण्यास सुरवात केली आणि एक ऑटोमॅटिक फेस शिल्ड तयार केले जे वर्गातील विद्यार्थ्यांचे तापमान सांगेल आणि सोशल डिस्टंसिंग तुटल्यावर सतर्कही करेल.

प्रत्येक वेळी फेस शिल्ड घातलेल्या व्यक्तीचे तापमान मिळत राहील

कानपूर येथील रहिवासी टिंकर इंडियाचे संस्थापक आणि जय नारायण विद्या मंदिरातील भौतिकशास्त्राचे शिक्षक कौस्तुभ ओमर यांनी मुलांसाठी सेफ्टी किट तयार केली आहे. सेफ्टी किटमध्ये फेस शील्डसह दोन प्रकारचे सेन्सर वापरण्यात आले आहेत. त्याचा प्रोटोटाइप बनवण्यासाठी सुमारे ६०० रुपये खर्च आला आहे. या सेफ्टी किटमध्ये समोर एक सेन्सर आहे आणि एक साइड स्क्रीन आहे. स्क्रीनवर प्रत्येक वेळी फेस शिल्ड परिधान केलेल्या मुलाचे तापमान मिळत राहील.

पुन्हा-पुन्हा तापमान चेक करण्याची आवश्यकता नसेल

वर्गात बसलेल्या मुलांच्या तपमानावर लक्ष असेल. एखाद्याचे तापमान जास्त असल्यास त्या विद्यार्थ्याला स्वतंत्रपणे बसवले जाऊ शकते. हे लावल्यानंतर मुलाचे तापमान पुन्हा पुन्हा तपासण्याची आवश्यकता नाही. जोपर्यंत मुलाने फेस शील्ड लावले आहे, तोपर्यंत तापमान कळत राहील. मुलांना कोरोना विषाणूच्या संसर्गापासून वाचवण्यासाठी हे खूप प्रभावी ठरेल.

सोशल डिस्टंसिंग तुटल्यावर वाजणार अलर्ट

जर कोणी सोशल डिस्टंसिंग तोडले तर शिल्ड समोरची एलईडी लाल रंगाच्या प्रकाशासह अलर्ट करेल आणि बझर वाजू लागेल. शिक्षक कौस्तुब ओमर म्हणाले की, या किटच्या निर्मितीसाठी दिल्ली आणि आसामच्या कंपनीशी चर्चा सुरू आहे.