आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधीत्व करण्यास अखिल भारतीय पोलीस नेमबाजी स्पर्धेचे व्यासपीठ उपयुक्त : DG एस. के. जैस्वाल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – अखिल भारतीय पोलीस नेमबाजी स्पर्धेच्या माध्यमातून पोलीस दलातील गुणवान क्रिडापटू पुढे येण्यास आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधीत्व करण्यास या स्पर्धेचे व्यासपीठ महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास राज्याचे पोलीस महासंचालक आणि संयोजन समितीचे अध्यक्ष एस. के. जैस्वाल यांनी आज व्यक्त केला.

तेराव्या अखिल भारतीय पोलीस नेमबाजी स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र पोलीसांच्या वतीने पुण्यात करण्यात आले. बालेवाडी क्रिडा संकुल व वडाची वाडी फायरिंग रेंज येथे 13 ते 18 जानेवारी दरम्यान या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेचे आज पोलीस महासंचालक एस. के. जैस्वाल यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, पिंपरी -चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, माजी पोलीस महासंचालक ए. व्ही. कृष्णन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे आदी उपस्थित होते.

जैस्वाल म्हणाले, महाराष्ट्र पोलीस दलाला खेळाची मोठी परंपरा आहे. देशपातळीवरील स्पर्धा महाराष्ट्रात घेण्यासाठी कायम आमचा प्रयत्न असतो. नेमबाजी एक साधनाच आहे. या माध्यमातून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धक जातील. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उंचावण्यासाठी या स्पर्धा नक्कीच उपयुक्त ठरतील,असे त्यांनी सांगितले.

पिंपरी – चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई म्हणाले, अखिल भारतीय नेमबाजी स्पर्धेत आंतरराष्ट्रीय विजेते सहभागी झाले ही आनंदाची बाब आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ही तिसरी स्पर्धा महाराष्ट्रात होत आहे. या स्पर्धेत 27 टीम व 560 स्पर्धक सहभागी झाले आहेत. यामध्ये 163 महिलांचा समावेश आहे. या स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

माजी पोलीस महासंचालक ए. व्ही. कृष्णन म्हणाले, या स्पर्धेसाठी अत्यंत प्रशस्त स्टेडियम मिळाले आहे. नेमबाजी स्पर्धेसाठी एकाग्रता, आत्मविश्वास महत्वाचा असून या स्पर्धेतून पोलीस विभागाची उंची निश्चितच वाढणार आहे. संचालन प्रमुख राकेश कदम यांनी स्पर्धेतील सहभागी खेळाडूंना खेळाबाबत शपथ दिली. यावेळी राष्ट्रीय एकात्मतेसंदर्भात सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. आभार अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी मानले. यावेळी विविध राज्यातून आलेले खेळाडू पोलीस अधिकारी, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फेसबुक पेज लाईक करा –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like