PM मोदी 13 ऑगस्टला लॉन्च करणार Tax संदर्भातील ‘ही’ स्कीम, प्रामाणिक करदात्यांचा होणार मोठा फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  लॉकडाऊनमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. आता सरकार अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे. याच दरम्यान करदात्याने सरकारवर विश्वास ठेवून योग्य वेळी कर भरावा, यासाठी मोदी सरकार मोठे पाऊले उचलणार आहे. त्याअंतर्गत उद्या गुरुवारी ट्रान्स्परन्ट टॅक्सेशन- प्रामाणिक लोकांसाठी सन्मान योजनेची सुरूवात होईल. पंतप्रधान मोदी स्वत: व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या योजनेचे उद्घाटन करतील.

सीबीडीटीने अलिकडच्या वर्षांत प्रत्यक्ष करांमध्ये अनेक प्रमुख किंवा मोठ्या कर सुधारणा लागू केल्या आहेत. मागील वर्षी कॉर्पोरेट कराचा दर ३० टक्क्यांवरून २२ टक्के करण्यात आला आणि नवीन उत्पादक घटकांसाठी हा दर आणखी १५ टक्क्यांपर्यंत करण्यात आला. ‘लाभांश वितरण कर’ देखील काढण्यात आला.

टॅक्स सुधारणांतर्गत सीबीडीटीने अनेक उपक्रम सुरु केले

कर सुधारणांतर्गत दर कमी करणे आणि प्रत्यक्ष कर कायद्यांचा सुरळीतपणा यावर लक्ष केंद्रित केले आहे. आयकर विभागाच्या कामकाजात दक्षता व पारदर्शकता यावी यासाठी सीबीडीटीने अनेक उपक्रम घेतले आहेत. नुकत्याच सुरू केलेल्या ‘डॉक्युमेंट आयडेंटिफिकेशन नंबर’ (डीआयएन) च्या माध्यमातून अधिकृत संप्रेषणामध्ये अधिक पारदर्शकता आणणे देखील या उपक्रमांमध्ये समाविष्ट आहे, ज्या अंतर्गत विभागातील प्रत्येक संप्रेषण किंवा पत्रव्यवहारावर एक विशिष्ट कॉम्प्युटर व्युत्पन्न कागदपत्र ओळख क्रमांक छापला जातो. त्याचप्रमाणे करदात्यांसाठी अनुपालन अधिक सुलभ करण्यासाठी वैयक्तिक करदात्यांना आयकर विभागाने आता ‘आधीच भरलेले रिटर्न फॉर्म’ सादर केले आहेत. त्याचप्रमाणे स्टार्ट-अपचेही अनुपालन निकषसुद्धा सुलभ केले आहेत.

डिजिटल व्यवहार आणि इलेक्ट्रॉनिक पद्धती किंवा देय देण्याच्या पद्धतींना चालना देण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. आयकर विभाग हे उपक्रम पुढे नेण्यासाठी वचनबद्ध आहे. एवढेच नव्हे, तर विभागाने ‘कोविड कालावधी’त करदात्यांसाठी अनुपालन सुलभ करण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत, ज्या अंतर्गत रिटर्न भरण्यासाठी वैधानिक अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे आणि करदात्यांच्या हाती तरलता किंवा रोख वाढवण्यासाठी वेगाने परतावा देण्यात आला आहे.

प्राप्तिकर विभागाचे अधिकारी व पदाअधिकाऱ्यांव्यतिरिक्त, विविध वाणिज्य मंडळ, व्यापार संघ आणि चार्टर्ड अकाउंटंट असोसिएशनसह नामांकित करदातादेखील या कार्यक्रमाचे साक्षीदार असतील. केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट कामकाज मंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थ व कॉर्पोरेट कामकाज राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकूरही या वेळी उपस्थित असतील.