महापालिकेतील अधिकाऱ्यांना कँटीनच्या अन्नातून विषबाधा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई महापालिकेच्या बी वॉर्डातील अधिकाऱ्यांना कँटीनच्या अन्नातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार आज घडला आहे. विषबाधा झालेल्या अधिकाऱ्यांना तातडीने नजीकच्या जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एकूण ८ अधिकाऱ्यांना विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. यामध्ये चार महिला आणि चार पुरुष अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर एका अधिकाऱ्याची प्रकृती नजूक असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज पालिकेच्या आठ अधिकाऱ्यांना विषबाधा झाल्याप्रकरणी दुपारी साडेचार वाजता जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये एका अधिकाऱ्याची एकाची प्रकृती चिंताजनक असून त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं आहे. तसेच इतर सात जणांची प्रकृती स्थिर आहे.

रुग्णालयात आणलं तेव्हा त्यांना मळमळ आणि उलट्या होत होत्या. प्राथमिक अंदाजानुसार, अन्नातून विषबाधा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. सध्या या सर्व रुग्णांवर उपचार सुरू आहेत.