पोलीस बंदोबस्तात छिंदम मतदानाचा हक्क बजावणार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी अडचणीत आलेला अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम महापौर निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी पोलिस बंदोबस्तात सभागृहात हजेरी लावणार आहे. पोलिस प्रशासनाने छिंदमचा अर्ज मंजूर केला आहे.

शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर श्रीपाद छिंदमला उपमहापौर पद गमवावे लागले होते. परंतु, नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग ९ मधून छिंदम अपक्ष म्हणून निवडून आला आहे. महापौर पदासाठी शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. बहुमतासाठी समीकरणे जुळविताना ‘छिंदम’चा पाठिंबा कोण घेणार? याची चर्चा रंगली होती.

महापालिकेत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी  जाताना  पोलीस संरक्षण देण्यात यावे, असा अर्ज छिंदम याने जिल्हा पोलिस प्रशासनाकडे केला होता. पोलिस प्रशासनाने बंदोबस्त मंजूर केला आहे. त्यामुळे छिंदम आता पोलिस संरक्षणात महापालिकेत येऊन मतदानाचा हक्क बजाविणार आहे.

तटस्थ नाही, मतदान करणार: छिंदम
महापौर पदासाठी होणाऱ्या निवडणुकीदरम्यान तटस्थ राहणार नाही. मतदान करून लोकशाहीचा हक्क बजावणार आहे, असे प्रतिपादन नगरसेवक श्रीपाद छिंदम याने केले आहे. तो आपले मत नेमके कोणाच्या टाकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.