बंदी असतानाही शाळांच्या परिसरात खुलेआम तंबाखू विक्री

पोलीसनामा ऑनलाइन टीम-मुंबई एका सामाजिक संस्थेने केलेल्या सर्वेमध्ये शालेय विद्यार्थी तंबाखूच्या व्यसनाच्या आहारी जात असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये छोट्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शाळा परिसरापासून १०० मीटर यार्डात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीस बंदी असूनदेखील शाळांच्या बाहेर राजरोस तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होताना दिसते. राज्यभरात सर्वत्र हिच परिस्थिती आहे. लहान मुलांना तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन लावल्यास बाल न्याय कायदा (काळजी आणि संरक्षण) कलमान्वये ६ वर्षांच्या शिक्षेची तरतूद असली तरी त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी मुलांना तंबाखूचे व्यसन लागण्याचे प्रमाण वाढले आहे.
शाळेच्या प्रवेशद्वारावर फलक लावणार
तंबाखू सेवनाच्या व्यसनामुळे मुलांना कॅन्सरसारखा गंभीर होऊ शकतो. याची दखल घेत सरकारने शाळेच्या परिसरात १०० यार्डात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास बंदी असल्याचे फलक शाळेच्या प्रवेशद्वारावर लावण्याचा निर्णय सध्या घेतला आहे. मुलांमधील तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन वाढत असल्याने शाळांपासूनच तंबाखूमुक्ती मोहीम राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. महाराष्ट्रातील सर्व शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त व्हाव्यात आणि मुलांना तंबाखूमुक्त वातावरण असावे यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये तंबाखूमुक्त शाळा धोरण राबवले जाणार आहे. राज्य सरकारने याबाबतचा जीआर काढला आहे. या अभियानात तंबाखूमुक्तीसाठी काम करणाऱ्या सलाम बॉम्बे फाऊंडेशनची मदत घेतली जाणार आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाने परिपत्रक काढून सर्व शाळांना पाठवले आहे. या अभियानात सहभागी होण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना केल्या आहेत.
शासनाच्या परिपत्रकातील ठळक मुद्दे
सरकारी परिपत्रकात नमूद केल्यानुसार, शाळेच्या परिसरात १०० यार्डात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास बंदी असल्याचे फलक शाळेच्या प्रवेशद्वारावर लावावेत. मुलांनी तंबाखूचं व्यसन करू नये यासाठी शाळांच्या मुख्याध्यापकांनी शाळेत तंबाखू सेवनाची बंदी असल्याची नोटीस काढावी. ही नोटीस सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व्यवस्थापन समिती यांना वाचून दाखवावी. धूम्रपान आणि तंबाखू सेवन करणे गुन्हा आहे हे विद्यार्थ्यांना सांगणारे फलक शाळेत महत्त्वाच्या ठिकाणी लावावेत. शाळेत डॉक्टर किंवा वैद्यकीय अधिकारी यांचे चर्चासत्र ठेवून त्यात तंबाखू आणि त्यामुळे होणारा कॅन्सर याबाबत माहिती द्यावी. दंत चिकित्सकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची मुख तपासणी करून घ्यावी. शाळेतील जे विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी तंबाखू नियंत्रणासाठी काम करत आहेत त्यांचा सत्कार करावा, असे परिपत्रकात नमूद केले आहे.