Gold Rate : देशात विकलं जातंय आतापर्यंत सर्वात महाग सोनं, चांदी 75 हजार रूपयांच्या पुढं, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय स्तरावर किंमतींच्या जोरदार वाढीमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली. गुरुवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोन्याच्या किंमतीत प्रति १० ग्रॅम २२५ रुपयांची वाढ झाली. सोन्याप्रमाणेच चांदीचे दरही वाढले. एक किलो चांदीची किंमत १,९३२ रुपयांनी वाढली. तज्ञांचे म्हणणे आहे की, कमकुवत डॉलर, केंद्रीय बँकांकडून प्रोत्साहनात्मक उपाय आणि वाढत्या कोरोना विषाणूच्या प्रकरणांमुळे सोन्याच्या सुरक्षित गुंतवणूकीत वाढ झाली आहे. नैसर्गिक आपत्ती, महामारी आणि राजकीय तणावात सोन्यात गुंतवणूक करणे सुरक्षित मानले जाते.

सोन्याचे नवीन दर
गुरुवारी दिल्ली सराफा बाजारात ९९.९ टक्के शुद्ध सोन्याचा भाव आतापर्यंतच्या सर्वात उच्च स्तरावर ५६,५९० रुपये प्रति १० ग्रामवर गेला आहे. याआधी बुधवारी हा भाव ५६,३६५ रुपये प्रति १० ग्रामवर बंद झाला होता. यादरम्यान सोन्यात २२५ रुपये प्रति १० ग्रामने सर्वात मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव २,०४५.७० डॉलर प्रति औस आहे.

चांदीच्या भावात विक्रमी वाढ
गुरुवारी दिल्लीत १ किलोग्रॅम चांदीचा भाव ७३,८२३ रुपयांवरून ७५,७५५ रुपये झाला. या दरम्यान किंमतीत १,९३२ रुपये मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव २७.५७ डॉलर प्रति औस आहे.

सोन्या-चांदीत वाढ का झाली ?
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटी) तपन पटेल म्हणाले, आंतरराष्ट्रीय स्तरावर किंमतीत मोठी वाढ झाल्यामुळे दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा हाजीर भाव २२५ रुपयाने वाढला. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतीत वाढ होऊन २,०४५.७० डॉलर प्रति औस आहे. तर चांदीचा भाव २७.५७ डॉलर प्रति औस आहे. रिलायन्स सिक्युरिटीजचे वरिष्ठ संशोधन विश्लेषक श्रीराम अय्यर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणू महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेतील रिकव्हरी रेटविषयी वाढलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांच्या खरेदीमुळे गुरुवारी आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ झाली.