सोन्याच्या किमतीनं मोडले सर्व ‘रेकॉर्ड’ ! भारतामध्ये ‘या’ कारणामुळं विकलं जातंय आतापर्यंतचं सर्वात महाग Gold, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोनाच्या या संकटात अमेरिका आणि चीनमधील वाढत्या तणावामुळे जगभरात सोन्याच्या किंमती आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचल्या आहेत. याचाच परिणाम देशांतर्गत बाजारावर दिसून येत आहे. बुधवारच्या जोरदार तेजीनंतर आता गुरुवारी देखील सोन्याच्या किंमती नव्या शिखरावर पोहोचल्या आहेत. दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत 502 रुपयांची वाढ झाली आहे. त्याच वेळी या काळात चांदीच्या किंमती खाली आल्या आहेत.

सोन्याच्या नवीन किंमती

दिल्ली सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 50,941 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढून 51,443 रुपये झाली आहे. या काळात दर 10 ग्रॅमच्या किंमती 502 रुपयांनी वाढल्या आहेत. देशात सोन्याची ही आतापर्यंतची सर्वोच्च किंमत आहे. त्याच वेळी आंतरराष्ट्रीय बाजाराबद्दल बघितलं तर आज सोन्याची नवीन किंमत 1,875 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचली आहे. मुंबईत मानक सोन्याची (99.5 टक्के) किंमत वाढून 50,350 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. त्याचबरोबर, 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याची किंमत वाढून 50,552 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे.

चांदीच्या नवीन किंमती

चांदीच्या किंमती खाली आल्या आहेत. दिल्लीत 1 किलोग्रॅम चांदीचा भाव 62,829 रुपयांवरुन 62,760 रुपयांवर आला आहे. या काळात किंमतींमध्ये 69 रुपयांची घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची नवीन किंमत 222.76 डॉलर प्रति औंसच्या नवीन शिखरावर पोहोचली आहे. त्याचबरोबर मुंबईत एक किलोग्रॅम चांदीची किंमत 60,586 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे.

सोन्या-चांदीची खरेदी का महाग झाली

एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमोडिटी विश्लेषक तपन पटेल म्हणतात की अमेरिका आणि चीनमधील तणाव वेगाने वाढत आहे. म्हणूनच गुंतवणूकदारांनी पुन्हा सुरक्षित गुंतवणूकीसाठी खरेदी सुरू केली आहे.