राज्यातील राजकारणात आज ‘फायनल’ ठरणार ? हालचालींना वेग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीचा निकाल २४ ऑक्टोबरला लागल्यानंतर आज ११ दिवस झाले. तरीही सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. आज सत्ता स्थापनेच्या दृष्टीने तीन महत्वाच्या भेटीगाठी होणार असल्याने आजचा दिवस अतिशय महत्वाचा ठरणार आहे.

त्यामुळे आज सायंकाळी मुख्यमंत्री कोणाचा होणार हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सायंकाळी भेटणार आहे. त्यात शिवसेनेला पाठिंबा द्यायचा का, शिवसेनेला पाठिंबा द्यायचा तर त्यांना काय अटी घालायच्या, ते पुन्हा भाजपाकडे जाऊ नये, यासाठी काय पावले उचलावीत. शिवसेनेला पाठिंबा दिला व त्यानंतर ते भाजपाबरोबर गेले तर पक्षाची फजिती होऊ नये, यासाठी काय करायचे याविषयी सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला येत असून ते अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेणार आहे. उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांचे जे काही ठरलंय त्याबाबत फडणवीस यांची चर्चा होणार आहे. शिवसेनेला आपल्याबरोबर घेण्यासाठी किती बाबी मान्य करायच्या याचाही निर्णय यावेळी
होण्याची शक्यता आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत हे सायंकाळी राज्यपालांची भेट घेणार आहे. त्यात ते सत्ता स्थापनेचा उद्धव ठाकरे यांचा निरोप राज्यपालांना देणार आहे. या तिन्हीही घडामोडीतून सत्ता स्थापनेविषयी महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यातील दोन्ही महत्वाच्या घडामोडी दिल्लीत होणार असल्याचे सर्वांचे लक्ष आता दिल्लीकडे लागले आहे.

Visit : Policenama.com