आज ‘मराठा क्रांती मोर्चा’ विधान भवनावर धडकणार

नाशिक : पोलीसनामा आॅनलाइन – मराठा क्रांती मोर्चाने सुरू केलेल्या संवाद यात्रेचा रविवारी समारोप झाला. आज सोमवारी ही यात्रा मुंबईतील विधान भवनावर धडकणार आहे. या आंदोलनासाठी राज्यभरातील समन्वयकांची तयारी झाली आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर झाला आहे. आरक्षणाबाबत घटनात्मक निकष पूर्ण केल्यानंतरही प्रत्यक्ष आरक्षणाचा लाभ मिळेल का नाही, अशी साशंकता मराठा समाजात आहे.
२६ नोव्हेंबर हा संवेदनशील दिवस असल्याचे कारण पुढे करून आंदोलनाची हवा काढण्याचे सरकारचे प्रयत्न मराठा क्रांती मोर्चाने हाणून पाडण्याचा निर्धार केला आहे. आंदोलनाची तारीख जाहीर झालेली असताना, तसेच त्यासाठी संवाद यात्रा सुरू असताना सरकारने एकदाही आरक्षण व इतर सर्व २० मागण्यांबाबत मराठा क्रांती मोर्चाच्या कोअर कमिटीसोबत चर्चा केली नाही वा त्यांच्याशी संपर्क साधला नाही. सरकारने या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण राबविले. त्यामुळे हे धडक आंदोलन होत आहे.

केवळ मुख्यमंत्र्यांच्या तोंडी घोषणेवर कोणीही विश्वास ठेवू शकत नाही. कायद्यात टिकणारा आरक्षणाचा कागदोपत्री निर्णय जोपर्यंत हातात पडत नाही तोपर्यंत आरक्षण मिळाले, असे म्हणता येणार नाही, असे मराठा समाजाचे म्हणणे आहे. यासाठी सरकारवर मराठा समाजाचा सामाजिक दबाव कायम ठेवणे व वाढविणे अत्यंत आवश्यक आहे, तसेच मराठा क्रांती मोर्चातून ज्या २० मागण्या करण्यात आलेल्या होत्या. त्याबाबतही सरकारने समाजाची घोर निराशाच केली आहे. याकरिता मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वय समितीच्या निर्णयानुसार सोमवारी सकाळी ११ वाजता मराठा समाज बांधव राज्यभरातून एकत्र येत विधान भवनावर धडक आंदोलन करण्याचा निर्णय यापूर्वी झाला आहे. या आंदोलनाच्या तयारीसाठी, तसेच समाज जागृती व्हावी, एकीची वज्रमूठ पुन्हा एकदा आवळली जावी, यासाठी १६ ते २६ नोव्हेंबर दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रात मराठा संवाद यात्रा सुरू केली होती. या संवाद यात्रेस समाजातून चांगला प्रतिसाद मिळाला. यासाठी गाड्यांवर झेंडे, पोस्टर्स व चलो मुंबई विधान भवनचा नारा देत पुन्हा एकदा मराठा समाजाची ताकद दाखवून द्यावी व आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य समन्वयक करण गायकर, तुषार जगातप, शरद तुंगार, गणेश कदम, शिवाजी राजे मोरे, सचिन पवार, बंटी भागवत, विलास जधाव आदींनी केले आहे.