नोटाबंदीची आज चौथी पुण्यतिथी, काँग्रेसने पाळला विश्वासघात दिन

पुणे – सामान्य माणसाचे कंबरडे मोडणारा नोटाबंदीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला त्याची आज चौथी पुण्यतिथी आहे. अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस, माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे.

काँग्रेस पक्षाच्या वतीने आजचा दिवस (दिनांक ८ नोव्हेंबर) हा विश्वासघात दिन म्हणून पाळला जात आहे. असे सांगून मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे की, नोटाबंदी लागू केल्यामुळे काळा पैसा बाहेर काढला जाईल, भ्रष्टाचार संपेल, अर्थपुरवठा रोखला गेल्याने दहशतवाद मोडून पडेल असे दावे पंतप्रधान मोदी यांनी केले. परंतु, यातील काहीच घडले नाही. उलट गेले चार वर्षे या निर्णयाचे दुष्परिणामच देशाला भोगावे लागले आहेत. अनेक उद्योग बुडाले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, देशाची आर्थिक घसरण होत गेली. अनेक अर्थतज्ज्ञ पंतप्रधानांच्या निर्णयापासून दूर झाले त्यातून देशाचीच हानी झाली.

सध्या तर अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोट्यवधीच्या आर्थिक पॅकेजच्या घोषणा केल्या. मात्र सामान्य माणसांसाठी त्या कुचकामी ठरल्या आहेत. सध्या सणावाराचे दिवस असूनही बाजारपेठांमध्ये शुकशुकाट आहे. कोरोना साथीमुळे आर्थिक उलाढालीवर परिणाम झाला हा दावा पूर्णपणे मान्य होणारा नाही, नोटाबंदीपासूनच अर्थव्यवस्था ढासळत आली आहे, ती आत्ताच्या काळात पूर्णपणे कोलमडली, असे मोहन जोशी यांनी पत्रकात नमूद केले आहे.