‘आज पुन्हा राम मंदिर उध्वस्त होतंय’ असं म्हणत कंगनानं ‘बाबर’शी केली राज्य सरकारची तुलना

बॉलिवूड स्टार कंगना रणौत हिच्या मुंबईतील कार्यलयावर पालिकेनं आज कारवाई केली. या कार्यालयातील काही अनधिकृत असलेलं अंतर्गत बांधकाम पाडण्यात आलं. या कारवाईचे फोटो ट्विट करत कंगनानं शिवसेनेवर पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे. गेल्या तासाभरात कंगनानं 5 ट्विट करत ठाकरे सरकारसह मुंबई महापालिकेला लक्ष्य केलं आहे.

एका ट्विटमध्ये तर कंगनानं तिच्या कार्यालयाला राम मंदिर म्हणत त्यावर कारवाई करणाऱ्यांची तुलना ही थेट बाबराशी केली आहे. कंगना म्हणते, “मणिकर्णिका फिल्म्स मध्ये पहिल्या सिनेमा घोषणा झाली, त्याचं नाव अयोध्या होतं. त्यामुळं ही माझ्यासाठी केवळ एक इमारत नाही तर राम मंदिर आहे. आज तिथं बाबर आला आहे. आज इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. राम मंदिर पाडलं जात आहे. परंतु बाबर तू हे लक्षात ठेव, तिथंच पुन्हा राम मंदिर उभारलं जाईल. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम.”

कंगनानं तिच्या कार्यालयावर सुरू असलेल्या कारवाईचे फोटो ट्विट करून त्याला पाकिस्तान असं कॅप्शन दिलं आहे. तसंच हा लोकशाहीचा मृत्यू आहे असंही म्हटलं आहे. बीएमसीचे अधिकारी आणि कर्मचारी कंगनाच्या घराबाहेर तैनात असलेला फोटो ट्विट करत बाबर आणि त्यांचं सैन्य असं सांगत शिवसेनेला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.