खुशखबर ! जन्माष्टमीच्या मुहूर्तावर 1317 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, 2943 रुपयांनी चांदीही घसरली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोन्या-चांदीच्या किंमतीतील निरंतर वाढ आता थांबली आहे. मंगळवारी सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली. मंगळवारी दिल्ली बुलियन मार्केटमधील सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 1,317 रुपयांनी स्वस्त झाला. त्याच वेळी, एक किलो चांदीची किंमत 2,943 रुपयांनी कमी झाली. रुपयाच्या मजबुतीमुळे स्थानिक बाजारपेठेत सोन्याच्या किंमती खाली आल्या असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. सोन्याच्या किंमती येत्या काही दिवसांत आणखी घसरतील.

सोन्याच्या नवीन किंमती
मंगळवारी दिल्ली बुलियन मार्केटमधील 99.9 टक्के शुद्धतेची सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 56,080 रुपये वरून 54,763 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आली आहे. या काळात दर 10 ग्रॅमच्या किमतींमध्ये 1,317 रुपयांनी घट झाली आहे. त्याचबरोबर मुंबईतील 99.9 टक्के सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 54528 रुपयांवर आली.

नवीन चांदीची किंमती
मंगळवारी सोन्याप्रमाणे चांदीच्या भावातही मोठी घसरण झाली आहे. दिल्लीत एक किलो चांदीची किंमत 76,543 रुपयांवरुन 73,600 रुपयांवर आली आहे. या कालावधीत, किमतींमध्ये 2,943 रुपयांची घट झाली आहे. त्याचबरोबर मुंबईतील चांदीचा दर प्रति किलो 72354 रुपयांवर आला आहे.

सोन्याच्या किंमतींबाबत तज्ज्ञांचे मत
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटी) तपन पटेल यांचे म्हणणे आहे की, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या किंमतींवर दबाव वाढला. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमती प्रति औंस 1,989 डॉलर पर्यंत खाली आल्या आहेत. तसेच रशियाने बनवलेल्या कोरोना विषाणूच्या लसीने ग्लोबल सेंटीमेंट सुधारला आहे. ज्यामुळे शेअर बाजार वेग परतला आहे. म्हणूनच गुंतवणूकदारांनी सोन्याची विक्री जोरात केली.

आणखी स्वस्त होईल सोने ?
कोटक सिक्युरिटीजने एका नोटमध्ये म्हटले आहे की, “जर अमेरिकन डॉलर मजबूत झाला तर सोन्यातील घसरण वाढू शकते. अशा परिस्थितीत घसरणीची प्रतीक्षा करूनच नवीन व्यवहार करा.