मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयातील आजची सुनावणी समाधानकारक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मराठा आरक्षणावर आजपासून नियमित सुनावणी सुरु झाली आहे. सुप्रीम कोर्टाने १ सप्टेंबर रोजी यावर निकाल देणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच या प्रकरणाची व्याप्ती पाहता ही सुनावणी ऑनलाइन न करता प्रत्यक्ष करावी, यासंदर्भात सुप्रीम कोर्ट गांभीर्याने विचार करत असल्याचं दिसून आले. म्हणून आजची सुनावणी समाधानकारक झाल्याचे मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले.

चव्हाण यांनी आजच्या सुनावणी बाबत माहिती देताना म्हटलं की, कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने राज्यातील नोकरभरती ४ मे रोजीच्या शासन निर्णयानुसार अगोदरच थांबली आहे. राज्य सरकारच्या वकिलांनी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली व नोकरभारती बद्दल तातडीने कोणताही निर्णय घेण्याची आवश्यकता नसल्याचा युक्तिवाद केला. पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील मराठा आरक्षणाला सुद्धा आज कोणतीही स्थगिती मिळाली नाही. पण मराठा आरक्षणाबाबत विरोधकांकडून सातत्याने स्थगितीची मागणी केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

तसेच या प्रकरणाची व्याप्ती पाहता अनेक हस्तक्षेप याचिकाकर्ते असून त्यांना देखील आपली बाजू मांडण्याची पुरेशी संधी मिळायला हवी, त्यामुळे ही सुनावणी ऑनलाइन माध्यमाऐवजी प्रत्यक्ष घावी, अशी राज्य सरकारची भूमिका आहे. यावर सुप्रीम कोर्ट गांभीर्याने विचार करत असल्याचं दिसून आले. तथापि, काही तांत्रिक बाबी विचारत घेता हे प्रकरण संवैधानिक खंडपिठाकडे सोपवण्याची मागणी पुढे आली होती. त्या पार्श्वभूमीवर २५ ऑगस्ट रोजी सुनावणी करणार असल्याचं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. येत्या काळात राज्य सरकार या प्रकरणी भक्कम बाजू मांडणार असून या प्रकरणाचा सकारात्मक निकाल आलेला दिसेल, असा विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.