भारताची आकाशातून गुप्त टेहाळणी वाढणार ; RISAT-2B चे यशस्वी प्रक्षेपण

चेन्नई : वृत्तसंस्था – श्रीहरीकोटा येथून बुधवारी सकाळी ५.३० वाजता आरआयसॅट-२बी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. त्यामुळे आता भारताची शत्रूवरील आकाशातून गुप्त टेहाळणी आणखी कडक होणार आहे. आरआयसॅट २ बी च्या उड्डाणाची २५ तासांची उलटगणती मंगळवारी पहाटे ४.३० वाजता सुरू झाली होती. हा उपग्रह गुप्त टेहाळणी करण्याचे मुख्य काम करणार असल्याने सरंक्षणाच्या दृष्टीने इस्त्रोच्या या उपग्रहाचे प्रक्षेपण महत्वाचे आहे.

हा सर्व प्रकारच्या हवामानात रडार इमेजिंगद्वारे निगराणी करणारा हा उपग्रह आहे. पीएसएलव्ही-सी४६ ची ही ४८वी मोहीम होती. सतीश धवन अंतराळ केंद्रातून हा ६१५ किलो वजनाचा उपग्रह बुधवारी सकाळी ठरलेल्या वेळी आकाशात झेपावला. प्रक्षेपण केल्यानंतर १५व्या मिनिटाला पृथ्वीच्या कक्षेत सोडण्यात आला.

हा उपग्रह गुप्त निगराणी, कृषी, वन व आपत्ती व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रांत मोलाची मदत करणार आहे. हा उपग्रह कृषी, वन व आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रासाठी मोलाची मदत करणार असला तरी त्याचे मुख्य काम हे गुप्त टेहाळणी करणे हे असणार आहे. त्यामुळे आपल्या देशाच्या सीमेवर कोठे काय हालचाली सुरु आहेत. पाकिस्तान अथवा चीन हे सीमा परिसरात काही गोष्टी लपून करीत आहेत का यावर बारीक लक्ष हा उपग्रह ठेवणार आहे.

काश्मीरमध्ये १९९८ मध्ये पाकिस्तानने कारगील परिसरात घुसखोरी केली होती. पर्वतावर भारतीय चौक्यांचा ताबा त्यांनी घेतला होता. ही गोष्ट आपल्याला समजली नव्हती. सीमा परिसरातील अत्यंत छोट्या हालचालीही लक्षात याव्यात, यासाठी उपग्रहामार्फत टेहाळणी करण्याचा काम इस्त्रोला सांगण्यात आले होते.

इस्रोसाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे़ अशी माहिती इस्रोचे प्रमुख के. शिवन यांनी दिली. तसेच या मोहिमेबाबत जास्त माहिती देण्यास नकार दिला आहे.