‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ हे मनाला पटत नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज दिल्ली येथील भाजपाच्या कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजचे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, अशा आशयाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि मोदी अशी थेट तुलना होऊच शकत नाही. त्यामुळे सगळीकडून भगवान गोयल यांनी लिहिलेल्या या पुस्तकावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी होताना दिसत आहे. दरम्यान राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावर जोरदार टिका केली आहे.

दिल्लीतील भाजपाच्या कार्यालयात आज भगवान गोयल लिखित ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे भाजप नेत्यांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले. या पुस्तक समारंभात भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी यांच्यसमवेत अजून इतर काही नेते उपस्थित होते. अशी माहिती भाजपचे नेते भगवान गोयल यांनी आपल्या फेसबुक व ट्वीटर अकाऊंटवरून दिली आहे.

दरम्यान राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या पुस्तक प्रकाशनाला विरोध दर्शवत भाजपावर जोरदार टीका केली आहे. जगाच्या अंतापर्यंत दुसरे छत्रपती शिवाजी महाराज होणे नाही. यामुळे ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ हे पटत नाही मनाला, असे म्हणत त्यांनी खिल्ली उडविली आहे.

भाजपकडून प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तकाला सोशल मिडियावरून मात्र प्रचंड विरोध होताना दिसत आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ही कुणाशीच होऊ शकत नाही असे म्हणत सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/