लहान मुलांना फळं खाऊ घालताना काळजी घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – काही फळं खुपच कडक असतात. अशी फळं लहान मुलांना खाण्यास देताना खूपच काळजी घेतली पाहिजे. फळाचा छोटासा तुकडा मुलास दिल्यास तो बराच वेळ त्यामध्ये रमतो आणि आपल्याला तेवढा निवांत वेळ मिळतो, म्हणून मुलांना असे फळ देणे घातक ठरू शकते. न्यूझिलंडमध्ये एका २२ महिन्यांच्या मुलाला अशाच प्रकारे डे केअरमध्ये सफरचंदाचा एक तुकडा देण्यात आला आणि त्यामुलाच्या जीवावर बेतले होते.

या संकटातून तो बाहेर आला. मात्र, आयुष्यभर त्यास व्हिलचेअरवर बसावे लागणार आहे. न्यूझीलँडच्या आरोग्य मंत्रालयाने कच्चा सफरचंद पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी धोकादायक खाद्य पदार्थाच्या यादीत ठेवलं आहे. नीहानासोबत ही घटना २०१६ मध्ये घडली होती. तेव्हापासून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पण डॉक्टरांनी आता स्पष्ट केलं आहे की, नीहानाच्या स्थितीत विशेष सुधारणा नाही आणि त्याला आता हे जगणं आयुष्यभरासाठी सहन करावं लागणार आहे.

या घटनेनंतर लहान मुलांसाठी तयार केल्या जाणाऱ्या फूड पॉलिसीमध्ये बदल करण्याची गरज न्यूझिलंडमध्ये व्यक्त केली जात आहे. तीन वर्षांपेक्षा कमी वयाच्या लहान मुला-मुलींना सफरचंद किंवा असंच एखादं कडक फळ उकडल्याशिवाय दिलं जाऊ नये, असे तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे. नीहाना रेनाटा या न्यूझीलँडच्या रोटोर्नामधील चिमुकला त्याची जुळी बहीण ओटीयासोबत डे केअरमध्ये होता. तेथील स्टाफने त्यास एक सफरचंदाचा छोटा तुकडा दिला. हा तुकडा त्याच्या घशात अडकला. नीहानाला श्वास घेता येत नव्हता. त्यामुळे ३० मिनिटातच त्याला कार्डियाक अरेस्ट आला आणि त्याचं शरीर हलणं बंद झालं.

या घटनेनंतर नीहानाला २ महिने रूग्णालयात रहावं लागलं. तो चालू शकत नव्हता, कोणतीही हालचाल करू शकत नव्हता. मुलाची अशी स्थिती झाल्यामुळे त्याची आई मारामाला नोकरी सोडावी लागली आणि आता ती २४ तास मुलासोबत असते. मारामा स्वत: एक डॉक्टर आहे. मात्र असं असलं तरी ती डे-केअरमधील स्टाफला यासाठी जबाबदार मानत नाही. पण तिचं म्हणणं आहे की, लहान मुलांसाठी कच्चा सफरचंद हानिकारक आहे.